'दबंग' अभिनेता सलमान खान Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाच्या तयारित व्यग्र आहे. दरम्यान नुकतंच त्याने बांद्रा येथील एक फ्लॅट विकला आहे. यातून त्याची कोट्यवधींची कमाई झाली आहे. तसंच तो राहत असलेल्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या काहीच किमी अंतरावर हा फ्लॅट आहे. सलमानने किती कोटींना विकला फ्लॅट? वाचा.
बांद्रा पश्चिमच्या पाली हिल या उच्चभ्रू परिसरात शिव अस्थान हाईट्स ही आलिशान इमारत आहे. याच इमारतीतील फ्लॅट सलमानने नुकताच विकला. स्क्वेअर यार्ड्स.कॉम नुसार, या फ्लॅटचा बिल्ट अप एरिया १३१८ स्क्वेअर फूट आहे. तीन कार पार्किंग स्पेस आहे. या करारासाठी ३२.०१ लाख स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी इतका खर्च झाला आहे. तर फ्लॅटच्या विक्रीची किंमत तब्बल ५.३५ कोटी रुपये आहे. याच महिन्यात हा करार झाला आहे.
सलमान खान बांद्रा बँडस्टँड येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. इथपासून हा फ्लॅट २.२ किमी अंतरावर आहे बांद्रा पश्चिम भाग हा उच्चभ्रू वस्तीचा भाग आहे. इथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं वास्तव्य आहे. शाहरुख खान, रणबीर कपूर, आमिर खान, सैफ-करीना, रेखा, फरहान अख्तर सारखे सेलिब्रिटी इथेच राहतात.
सलमान खान सुरुवातीपासूनच गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आईवडिलांसोबत राहतो. हे फक्त २ बीएचके अपार्टमेंट आहे. एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्याला इथेच राहायला आवडतं याचं अनेकांना अप्रुप वाटतं. सलमान लवकरच 'बिग बॉस १९'चं होस्ट करणार आहे. तसंच 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमात तो भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. यामध्ये त्याच्यासोबत चित्रांगदा सिंह मुख्य अभिनेत्री आहे.