सलमान खानने ईदच्या मुहुर्तावर चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'सिकंदर' ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. भाईजानच्या या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मात्र सिनेमा रिलीज होताच 'सिकंदर'कडे चाहत्यांनी पाठ फिरवली. देशात सलमानच्या सिनेमाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र असलं तरी परदेशात मात्र 'सिकंदर'ची हवा आहे.
'सिकंदर' सिनेमा प्रदर्शित होऊन ८ दिवस झाले आहेत. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे. 'सिकंदर'ने पहिल्या दिवशी देशात २६ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २९ कोटींची कमाई करत मंडे टेस्टमध्ये हा सिनेमा पास झाला होता. त्यानंतर मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसलं. आत्तापर्यंत सिनेमाने देशात १०२.५९ कोटींचा बिजनेस केला आहे.
देशातील 'सिकंदर' सिनेमाचे आकडे काही खास नसले तरी परदेशात मात्र या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. या सिनेमाने आठव्या दिवशी ४ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात आत्तापर्यंत सिनेमाने १९७.४८ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच 'सिकंदर' सिनेमा २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. 'सिकंदर'मध्ये सलमानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर २०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाची सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे.