बॉलिवूडचे तीन खान सलमान, शाहरुख आणि आमिर आता वयाच्या साठीत आहेत. सलमान खान यावर्षी साठ वर्षांचा होणार आहे. तीनही खानची लोकप्रियता आजही तितकीच आहे. सलमान खान (Salman Khan) आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाच्या तयारित व्यग्र आहे. या सिनेमात तो भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. यासाठी सलमानला अनेक अॅक्शन सीन्स करावे लागणार आहेत. मात्र वयाच्या साठीत आता अॅक्शन सीन्स करणं दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचं तो म्हणाला आहे.
गलवान खोऱ्यात भारत विरुद्ध चीनमध्ये झालेल्या संघर्षावर 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमा आधारित आहे. या सिनेमासाठी सलमान खान मेहनत घेत आहे. त्याने बरंच वजनही घटवलं आहे. सिनेमाबद्दल माध्यमांशी बोलताना सलमान म्हणाला, "या सिनेमातील भूमिका शारिरीकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. दर दिवशी हे आणखी कठीण होत जात आहे. मला ट्रेनिंगसाठी जास्त वेळ द्यावा लागत आहे. आधी मी अशा सिनेमांसाठी एक-दोन आठवड्यांचंच ट्रेनिंग घ्यायचो. पण आता मला रनिंग, किक बॉक्सिंगही करावं लागत आहे. हे सगळं सिनेमासाठी करणं गरजेचं आहे."
तो पुढे म्हणाला, "मी सिकंदर सिनेमा करत होतो तेव्हा त्यातील अॅक्शन सीन्स वेगळे होते. ती भूमिकाही वेगळी होती. पण बॅटल ऑफ गलवान खूप आव्हानात्मक आहे. यात मला लडाखमधील उंच डोंगरावर आणि थंड पाण्यात शूट करावं लागणार आहे. हे फार चॅलेंजिंग काम आहे. जेव्हा मी सिनेमा साईन केला तेव्हा मी खूप उत्साहित होतो. इतर सिनेमांसारखीच मला याचीही तयारी वाटली. पण वास्तविक पाहता शूटिंगच्या दृष्टीने हा अवघड सिनेमा आहे. मला लडाखमध्ये २० दिवस राहावं लागणार आहे. याच महिन्यात आम्ही तिकडे शूट सुरु करणार आहोत. सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज होऊ शकतो."
बजरंगी भाईजानबद्दल सलमान म्हणाला, "मला बजरंगी भाईजान सिनेमा आवडला होता. आता नवीन सिनेमात तसाच इमोशनल अँगल असेल मात्र गोष्ट वेगळी असेल."