बॉलिवूड म्हटलं की नेपोटिझमचा मुद्दा कायमच चर्चेत असतो. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक स्टारकिडही बॉलिवूडची वाट धरतात. आलिया भट, रणबीर कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन, सारा खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर हे स्टारकिड्स अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. यापैकी कित्येकांना करण जोहर आणि सलमान खानने लॉंच केलं आहे. बॉलिवूडमधील नेपोटिझमवरुन अनेकदा कंगना रणौतने भाष्य केलं आहे. आता तिला भाईजानने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
सलमान खानने 'सिंकदर' सिनेमाच्या निमित्ताने नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारला. पण, सलमानने रवीना ऐवजी कंगना असं ऐकलं. त्याने विचारलं "कंगनाची मुलगी येतेय?" त्यानंतर पत्रकाराने त्याचं कन्फ्युजन दूर केलं. पण, नंतर भाईजानने कंगनाला टोला लगावला.
"कंगना रणौतची मुलगी राजकारणात जाईल की सिनेमा करेल? म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी...त्यांनाही काहीतरी वेगळं करावं लागेल. या जगात असं कोणीच नाही ज्याने स्वत:च्या हिमतीने स्वत:ला घडवलं आहे. माझा यावर विश्वास नाही. हे एक टीम वर्क आहे. जर माझे वडील इंदौरवरुन मुंबईला आले नसते तर मीदेखील तिकडे शेती करत असतो. ते इकडे आले, सिनेमात काम केलं. आता मी त्यांचा मुलगा आहे. मी एक तर परत जाऊ शकतो किंवा इथेच मुंबईत राहू शकतो. या सगळ्यासाठी लोक नवीन शब्द शोधतात. जसं की तुम्ही सगळे वापरता ते म्हणजे नेपोटिझम", असंही पुढे सलमान म्हणाला.