Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या दुःखातून अजूनही सावरला नाही सलमान खान; म्हणाला- "माझ्या आयुष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:58 IST

सलमान खान धर्मेंद्र यांच्या दुःखातून अजूनही सावरला नाही. एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सलमानने धर्मेंद्र यांच्याविषयी भावुक भावना व्यक्त केल्या

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त सुपरस्टार सलमान खानला या घटनेचा मोठा धक्का बसला असून, तो अजूनही या दु:खातून सावरू शकलेला नाही. नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सलमानने धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, एका आंतरराष्ट्रीय इव्हेंटमध्ये सलमान खानने सांगितले की, "मी काही दिवसांपूर्वीच माझ्या वडिलांच्या जागी असलेल्या धर्मेंद्र यांना गमावलं आहे. मी नेहमीच त्यांना फॉलो करत आलो आहे. धर्मेंद्र यांनी मला खूप प्रेरणा दिली. माझ्या करिअरमध्ये मी जे काही केले आहे, ते सर्व धरमजींकडून शिकूनच केले आहे. माझ्या आयुष्यात दोनच व्यक्ती अशा राहिल्या ज्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली - एक माझे वडील सलीम खान आणि दुसरे म्हणजे धरमजी."

अशाप्रकारे सलमानने धर्मेंद्र यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. सलमान आणि धर्मेंद्र यांचे नाते अत्यंत जवळचे होते. सलमानने नेहमीच त्यांना आपला आदर्श मानले, तर धर्मेंद्र यांनीही अनेकवेळा जाहीरपणे सांगितले होते की, सलमान खान हा त्यांच्या तिसऱ्या मुलासारखा आहे. 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. इतकंच नव्हे सलमानच्या आग्रहास्तव धर्मेंद्र 'बिग बॉस'च्या मंचावरही आले होते.

 धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी प्रकृतीच्या कारणास्तव निधन झाले. त्यांच्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या निधनानंतर 'बिग बॉस १९' च्या ग्रँड फिनालेमध्येही सलमान त्यांच्या आठवणीत ढसाढसा रडताना दिसला होता. सलमानने पुढे म्हटले की, "धरमजी खऱ्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिक आणि चांगले व्यक्ती होते." धर्मेंद्र यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून सलमान आजही त्यांच्या आठवणीत भावूक होताना दिसतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan Still Grieving Dharmendra's Death: 'In My Life...'

Web Summary : Salman Khan deeply mourns Dharmendra's passing, considering him a father figure and inspiration alongside his own father. He credited Dharmendra for his career success and expressed profound grief at losing him, highlighting their close bond and Dharmendra's genuine nature.
टॅग्स :सलमान खानधमेंद्रमृत्यूबॉलिवूड