सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीत बिजलानीच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगीताच्या पुणे जिल्ह्यातील मावळ येथील फार्महाऊसमध्ये चोरी आणि तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री चार महिन्यांनी फार्म हाऊसवर गेली तेव्हा ही गोष्ट तिच्या समोर आली. त्यानंतर अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दिली. चोराने फार्महाऊसवरील अनेक महागड्या वस्तू चोरी केल्या आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीत संगीताने सांगितलं की फार्महाऊसचा मुख्य दरवाजा आणि खिडकीची ग्रील तुटलेली होती. घरातून टीव्ही गायब असल्याचंही तिने सांगितलं. त्याशिवाय घरातील पलंग, फ्रिज आणि सीसीटीव्ही कॅमेरा याची तोडफोडही झाली आहे. वडिलांची तब्येत बरी नसल्याने ती फार्महाऊसवर येऊ शकली नाही असं तिने पोलिसांना सांगितलं.
संगीता बिजलानी म्हणाली, "आज मी माझ्या दोन हाऊस हेल्परसोबत फार्महाऊसला गेले. तिथे गेल्यावर समजलं की मुख्य दरवाजा तुटला होता. खिडकीची ग्रीलही तुटलेली होती. एक टीव्ही गायब होता आणि दुसरा तुटलेला होता. वरच्या मजल्यावर सगळं सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. काही किमती वस्तूही गायब होत्या". या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.