सलमान खानचा २०१५ साली आलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील मुन्नी आणि बजरंगी भाईजानची स्टोरी प्रेक्षकांना भावली होती. पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या मुन्नीला पुन्हा तिच्या आईची भेट घडवून देण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या बजरंगी भाईजानला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या प्रतिक्षेत चाहते होते. आता पहलगाम हल्ल्यानंतर 'बजरंगी भाईजान २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान 'बजरंगी भाईजान २' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ईदच्या मुहुर्तावर भाईजानचा सिकंदर सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर 'बजरंगी भाईजान २'चा सलमान विचार करत आहे. या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा सलमान बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'बजरंगी भाईजान २'बाबत सिनेमाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी मोठी अपडेट दिली आहे.
विजयेंद्र प्रसाद यांनी नुकतीच सलमानची भेट घेतली होती. "मी ईदला सलमानला भेटलो होतो. मी त्यांना एक लाइन सांगितली. त्याला ती आवडली. आता बघुया पुढे काय होतंय", असं ते म्हणाले. न्यूज २४ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान आणि विजयेंद्र प्रसाद यांच्यात 'बजरंगी भाईजान २'बाबत चर्चा झाली आहे. यामध्ये दिग्दर्शक कबीर खानही भाग घेण्याची शक्यता आहे. पण, अद्याप कोणत्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
दरम्यान, 'बजरंगी भाईजान'चं शूटिंग हे जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालं आहे. या सिनेमातील अनेक सीन्स जम्मू-काश्मीरमध्ये शूट करण्यात आले आहेत. तर 'बजरंगी भाईजान'मधील क्लायमॅक्स सीन पहलगाममध्ये हल्ला झाला त्याठिकाणी शूट करण्यात आला आहे.