98 वर्षांचे बॉलिवूडचे दिग्गजअभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना प्रकृती कारणास्तव मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून रूटीन चेकअपसाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो ( Saira Banu ) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती बरी आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. आम्ही रूटीन चेकअपसाठी येथे आलो होतो. परमेश्वराच्या कृपेने आम्ही लवकरच सुरक्षित घरी जाऊ, असे सायरा बानो यांनी ई-टाइम्सशी बोलताना सांगितले.
दिलीप कुमार व सायरा बानो बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. सायरा बानो सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्यासोबत आहेत. त्यांची सेवा करत आहे़ ‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है,’ असे सायरा बानो यावेळी यापूर्वी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत, असे सायरा बानो म्हणाल्या होत्या.