अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. अभिनेत्याच्या घरात घुसलेल्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पायऱ्या उतरताना दिसला. या हाय प्रोफाइल प्रकरणाची उकल करण्यासाठी मुंबई पोलीस काम करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी २० टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीमला वेगवेगळा टास्क देण्यात आला आहे.
हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलीस त्यांना माहिती देणाऱ्यांच्या, खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर करत आहेत. तपास पथक टेक्निकल मदत घेत आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी प्रत्येक तंत्राचा वापर केला जात आहे. आरोपीचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का?, हे देखील शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलीस इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत, ज्यामध्ये चोर सैफवर हल्ला केल्यानंतर लाकडी काठी आणि लांब हेक्सा ब्लेड घेऊन पळून जाताना दिसत आहे. हे फुटेज २.३३ वाजल्याचं आहे. यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पायऱ्या उतरत असलेल्या आरोपीने तपकिरी कॉलर असलेला टी-शर्ट आणि लाल स्कार्फ घेतला होता.
सैफ अली खान त्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर राहतो. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. सैफच्या घरातून पळून जाण्यापूर्वी हल्लेखोराने कपडे बदलले होते, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सैफच्या घरी ५६ वर्षीय स्टाफ नर्स देखील उपस्थित होती. तिचं नाव एलियामा फिलिप आहे. या घटनेत तिलाही दुखापत झाली. पोलिसांनी स्टाफ नर्स, घरातील कर्मचारी, इमारतीचे रक्षक आणि इतरांचे जबाब नोंदवले आहेत.
१६ जानेवारीच्या रात्री एका चोराने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. सैफवर चाकूने ६ वेळा वार केले. सैफला ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यातून २.५ इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. आता तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या कठीण काळात, इंडस्ट्रीतील लोक आणि चाहते सैफ आणि करीनाच्या पाठीशी उभे आहेत.