बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. सैफने सांगितलं की, १६ जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर ११ व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते तेव्हा त्यांना त्यांची नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला. सैफने हल्लेखोराला पकडलं. पण त्याचवेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले.
मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात अभिनेत्याने म्हटलं आहे की, जेव्हा त्याने नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या खोलीकडे धावत गेले. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला. जहांगीरही रडत होता. जेव्हा हल्लेखोराने चाकूने वार केले तेव्हा सैफ गंभीर जखमी झाला आणि त्याने कशीतरी स्वतःची सुटका केली आणि नंतर हल्लेखोराला मागे ढकललं.
सैफने सांगितलं की, हा माणूस घरात कसा घुसला हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि भीतीही वाटली. हल्लेखोराने फिलिपवरही हल्ला केला. आता अभिनेत्याची प्रकृती बरी असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या. सध्या डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
"१०,००० पाठवलेत, माझ्याकडे..."; सैफवर हल्ला केल्यावर आरोपीचा बांगलादेशात वडिलांना फोन
सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लामबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. शरीफुलचं कुटुंब बांगलादेशातील झालोकाठी येथे राहतं. सैफवर हल्ला केल्यानंतर काही तासांनी आरोपीने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्या कॉल दरम्यान त्याने वडिलांना सांगितलं की, वडिलांच्या खात्यात १०,००० ट्रान्सफर केले आहेत. त्याच्याकडे आता तीन हजार शिल्लक आहेत. ते त्याला पुरेसे आहेत.