१६ जानेवारीच्या रात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. घरात चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी त्याची झटापट झाली. त्यानंतर हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. यामध्ये अभिनेत्याच्या मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती आता सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शुक्रवारी सैफ अली खानचे मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा सैफ रुग्णालयात आला तेव्हा तो रक्तबंबाळ झाला होता. पण तरीही तो सिंहासारखा चालत होता. सैफ त्याचा ८ वर्षांचा मुलगा तैमूरला घेऊन रुग्णालयात पोहोचला. स्वतः चालत आला होता. त्याने एका हिरोसारखं काम केलं आहे. तो खऱ्या आयुष्यातील हिरो आहे. त्यांची तब्येत आता ठीक आहे. अभिनेत्याला आयसीयूमधून एका स्पेशल रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सध्या त्याला विश्रांतीची गरज आहे.
आम्ही त्यांची नुकतीच तपासणी केली आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे. त्याच्या जखमा बऱ्या होत आहेत. त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागेल. पाठीच्या दुखापतीची काळजी घ्यावी लागेल अन्यथा संसर्गाचा धोका असतो. कमी हालचाली कराव्या लागतील. देवाच्या कृपेने तो ठीक आहे. संसर्गाच्या भीतीमुळे, सैफला व्हिजिटर्सपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सैफला १ आठवडा बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, सैफ पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. तो २ मिमीने वाचला, अन्यथा जर चाकू त्याच्या मणक्याला लागला असता तर दुखापत खूप खोलवर झाली असती. त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. सैफच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समजल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्या पद्धतीने अभिनेत्याने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हल्लेखोराशी झुंज दिली, त्यामुळे सर्वजण त्याला खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणत आहेत.
"सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून पळाला"; आरोपीला पकडण्यासाठी २० टीम तयार
सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. अभिनेत्याच्या घरात घुसलेल्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पायऱ्या उतरताना दिसला. या हाय प्रोफाइल प्रकरणाची उकल करण्यासाठी मुंबई पोलीस काम करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी २० टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीमला वेगवेगळा टास्क देण्यात आला आहे.