Join us

सर्जरीनंतर सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज, फ्रॅक्चर हात पाहून चाहत्यांना टेन्शन; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:58 IST

त्याचा हात फ्रॅक्चर असल्याने हाताला पट्टी बांधण्यात आलेली दिसते.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला(Saif Ali Khan) काल कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे सैफचे चाहते चिंतेत पडले होते. अभिनेत्याची ट्रायसेप सर्जरी काल पार पडली. 53 वर्षीय सैफ अली खानला 'देवारा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीक्वेन्स शूट करताना दुखापत झाली. याचमुळे काल सोमवारी त्याचे ऑपरेशन झाले. तर आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून घरी आल्यानंतरचा सैफचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सैफ अली खान सर्जरीनंतर एकदम फिट दिसत आहे. त्याचा हात फ्रॅक्चर असल्याने हाताला पट्टी बांधण्यात आलेली दिसते. त्याने ब्लॅक टीशर्ट आणि डेनिम जीन्स घातलेली आहे तर डोळ्याला गॉगल लावून तो एकदम कूल लूकमध्ये दिसत आहे. तर सोबत बेबो करिना कपूर खानही दिसत आहे. सैफ सर्वांना हात दाखवत तो ठीक असल्याचं सांगताना दिसत आहे. 

'झूम' टीव्हीशी बोलताना सैफ म्हणाला, 'मी आधी दुखापतीकडे दुर्लक्ष केलं होतं. पण नंतर ते वाढलं. वर्कआऊट करताना दुखापत वाढली. जोर दिल्याने मला जास्तच दुखत होतं. म्हणून मी एमआरआय काढला. कारण मी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुट्टीवर गेलो असतानाच दुखायला सुरुवात झाली होती. तेव्हाच समजलं होतं की माझ्या ट्रायसेपला वाईट पद्धतीने दुखापत झाली आहे. रबर बँड सारखं मोठ्या मुश्किलीने तो जागेवर होता नाहीतर कधीही तुटला असता. 

तो पुढे म्हणाला,'देवारा सिनेमाच्या काही कमिटमेंट्स पूर्ण केल्यानंतर मी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच डॉक्टरांनाही जाणीव झाली की तातडीने सर्जरी करण्याची गरज आहे. त्यांनी हात कापला साफ केला तेव्हा खूप फ्लूड निघालं. स्नायू जोडले ट्रायसेप सील केलं. डॉक्टरांनी त्यांचं काम उत्तम केलं आणि सर्जरी यशस्वी झाली. जर सर्जरी केली नसती तर मला कठीण गेलं असतं. 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरहॉस्पिटलबॉलिवूड