अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक टीव्हीवर त्याचा फोटो पाहिल्यानंतर घाबरला होता. तो आपल्या देशात पळून जाण्याचा प्लॅन करत होता. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. ३० वर्षीय हल्लेखोराने बांगलादेशातील त्याच्या भावाला कागदपत्रं पाठवण्यास सांगितली होती, ज्यामुळे पोलिसांना तो शेजारच्या देशातील रहिवासी असल्याचं समजलं. आरोपीचं नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असं आहे. त्याने आपलं नाव बदलून विजय दास असं ठेवलं होतं.
सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केल्यानंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली. या फुटेजमध्ये तो हल्ल्याच्या एक आठवडा आधी ९ जानेवारी रोजी बाईकवर दिसला होता. त्यानंतर काही दिवसांनी तो वांद्रे येथील सैफच्या घरात घुसला आणि सैफवर अनेक वार केले. अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या. आता सैफला डिस्चार्ज मिळाला असून त्याला काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मुंबई पोलिसांच्या विविध पथकांनी पुरावे गोळा करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातील फुटेज स्कॅन केलं. सुरुवातीला, हल्लेखोराचा शोध घेण्यात पोलिसांना आव्हानांचा सामना करावा लागला. बांगलादेशातील झालोकाटी येथील रहिवासी असलेला शहजाद मुंबईत गेल्या पाच महिन्यांपासून राहत होता, तो छोटी-मोठी कामं करत होता आणि एका स्वच्छता करणाऱ्या एजन्सीशी संबंधित होता.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या त्याच्या फोटोवरून ओळख पटवली. पोलिसांना मिळालेल्या फुटेजमध्ये, तो ९ जानेवारी रोजी अंधेरीतील एका चौकातून बाईकवरून जाताना दिसला. पोलिसांनी बाईकच्या नंबरवरून मालकाचा शोध धेतला. तेव्हा पोलिसांना हल्लेखोराचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या लक्ष ठेवून त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली.
या डिजिटल रेकॉर्डमुळे पोलिसांना ठाण्यात त्याचा ठावठिकाणा शोधण्यास मदत झाली आणि परिसरात आणि आजूबाजूला शोध पथकं तैनात करण्यात आली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अखेर, आरोपी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील दाट खारफुटीच्या परिसरात सापडला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान शहजादने सांगितलं की, न्यूज चॅनेल आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो पाहिल्यानंतर तो खूप घाबरला होता. त्याने दावा केला की, तो बांगलादेशला पळून जाण्याचा विचार करत होता. गुन्ह्याच्या ठिकाणी असलेल्या 'डक्ट' आणि बाथरुमच्या खिडकीजवळ सापडलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांचे ठसे हे मॅच होतात का हे पाहिलं जाणार आहे.