Saif Ali Khan Stabbing: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हल्ल्याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात १००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध अनेक पुरावे त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. दुसरीकडे शरीफुलच्या वकिलाने दावा केला आहे की त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी एका हल्लेखोराने अभिनेत्यावर चाकूने वार केले होते. या प्रकरणात वृत्तसंस्था एएनआयनुसार, मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात वांद्रे न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र १००० पेक्षा जास्त पानांचे आहे. या आरोपपत्रात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींकडून जप्त केलेला चाकूचा तुकडा, गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला भाग आणि सैफच्या मणक्यातून काढलेला तुकडा, हे तिघेही एकाच चाकूचे आहेत. याशिवाय, तपासादरम्यान पोलिसांना सापडलेल्या आरोपीच्या डाव्या हाताच्या फिंगरप्रिंट रिपोर्टचाही उल्लेख करण्यात आला आहे.
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली आरोपी शरीफला जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर सैफ उपचारासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.