Join us

३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये घडणार 'ही' गोष्ट, सई आणि इमरानचा 'ग्राउंड झिरो' रिलीजपूर्वीच चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:31 IST

सई आणि इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' आता इतिहास रचणार आहे.

मराठीसह बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चर्चेत आहे. सई सध्या एकामागून एक बॉलिवूड प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.  सईचा बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबतचा 'ग्राउंड झिरो' (Ground Zero Movie) चित्रपट येतोय. हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर श्रीनगरमध्ये होणार आहे. 

सई आणि इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' आता इतिहास रचणार आहे. तब्बल ३८ वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाचा प्रिमियर  श्रीनगरमध्ये होणार आहे. गेल्या तीन दशकांनंतर श्रीनगरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित  'ग्राउंड झिरो' चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरणही तिथेच झाले आहे.  'ग्राउंड झिरो'बद्दल प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. हा चित्रपट आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना दाखवला जाईल. हे पाऊल केवळ देशभक्ती प्रतिबिंबित करत नाही तर खऱ्या नायकांना श्रद्धांजली वाहणारं आहे.

 'ग्राउंड झिरो' या चित्रपटात इमरान हाश्मीने बीएसएफ कमांडंट नरेंद्र नाथ धर दुबे यांची भूमिका साकारली आहे. ज्यांनी गाझी बाबाला मारण्याच्या ऑपरेशनचे नेतृत्व केलं होतं. गेल्या ५० वर्षांतील बीएसएफचे सर्वोत्तम ऑपरेशन म्हणून या मोहिमेची नोंद आहे. गाझी बाबा हा जैश-ए-मोहम्मदचा एक टॉप कमांडर आणि हरकत-उल-अन्सार नावाच्या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर होता. १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार मानला जातो. हा चित्रपट तेजस देवस्कर यांनी दिग्दर्शित केला आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकरबॉलिवूडइमरान हाश्मीश्रीनगर