Join us

Riteish Deshmukh "लायकी नसेल तर...", कलाकारांच्या मानधनावरुन नाराज होणाऱ्या निर्मात्यांना रितेश देशमुखचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:14 IST

Riteish Deshmukh रितेश देशमुख फक्त अभिनेता नसून दिग्दर्शक, निर्माताही आहे.

फिल्म इंडस्ट्रीत सध्या कलाकारांच्या अवाजवी मानधनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. करण जोहर ते अनुराग कश्यप अशा सर्वच निर्मात्यांनी यावर खुलेपणाने भाष्य केलं होतं. आजकाल फिल्मस्टार्सची फीस आणि त्यांच्या मागण्या वाढल्या आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. आता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) या विषयावर मत मांडलं आहे. यामध्ये त्याने कलाकारांचीच बाजू घेतली आहे.

रितेश देशमुख फक्त अभिनेता नसून दिग्दर्शक, निर्माताही आहे. नुकतीच त्याने 'डीएनए'ला मुलाखत दिली. यावेळी कलाकारांच्या अवाजवी मानधनावर बोलताना तो म्हणाला, "मला वाटतं अभिनेता आणि त्याच्या टीमकडे एक संपूर्ण पॅकेज म्हणून पाहिलं पाहिजे. एक निर्माता म्हणून जर तुम्हाला वाटतं की हा कलाकार त्या लायक नाही तर त्याला साईन करु नका. जर तुम्हाला वाटतं की अभिनेता तेवढी रक्कम सिनेमाच्या कमाईतून आणेल तर त्याला घ्या. जर चार निर्मात्यांनी मानधनामुळे त्याला घेतलंच नाही तर तो स्वत:च मानधन कमी करेल."

तो पुढे म्हणाला, "बजेट तर साहजिकच वाढणार आहे कारण तुम्हाला त्यात एक्सपर्ट पाहिजे. जेव्हा तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी हवं असतं तेव्हा बजेट वाढतं. जर परदेशी वस्तूंचा वापर केला तरी बजेट वाढणार आहे. जर सिनेमा हिट झाला तर सगळा खर्च वसूल होतो. पण जर सिनेमा आपटला तर खर्चावर परिणाम होतो. यातला सर्वात जास्त व्हेरिएबल खर्च हा अभिनेत्याचा असतो. मला वाटतं की सर्वांचीच जबाबदारी असली पाहिजे. जास्त मानधन घेणारा अभिनेता प्रॉफिट शेअर करतो आणि यामुळे तो निर्मात्याचंही ओझं हलकं करतो. हे दोघांसाठी फायदेशीर असतं."

टॅग्स :रितेश देशमुखबॉलिवूडसेलिब्रिटी