Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर (Riteish Deshmukh Manager Death) होते. राजकुमार तिवारी केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्याच्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. रितेशनं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रितेश देशमुखनं इन्स्टाग्रामवर राजकुमार तिवारी यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "राजकुमार तिवारी यांचे निधन झाल्याचं ऐकून मन सुन्न झालं असून मोठा धक्का बसला आहे. ते माझे मार्गदर्शक होते, माझे मोठे भाऊ, आणि माझं कुटुंबच होते. माझ्या पदार्पणापासून त्यांनी माझं काम हाताळलं आणि कठीण काळात कायम माझ्या सोबत ठामपणे उभे राहिले. मला तुमची कायम आठवण येईल तिवारीजी. त्यांचे कुटुंबीय विशेषतः त्यांची मुलं सिद्धार्थ आणि सुजीत यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो", या शब्दात रितेशनं दु:ख व्यक्त केलं.
रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जिनिलिया डिसूझा हिची प्रमुख भूमिका होती. विशेष म्हणजे, त्याच वेळेपासून रितेशसोबत राजकुमार तिवारी हे मॅनेजर म्हणून कायम होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार तिवारी यांनी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबतही काम केलं होतं.
स्वतः रितेश देशमुखने यासंदर्भात एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये राजकुमार तिवारी हे विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यासोबत पाहायला मिळाले. रितेशने या फोटोला कॅप्शन दिलं होतं, "माझे मॅनेजर राजकुमार तिवारी, आमच्या इंडस्ट्रीमधील दोन रॉकस्टार्ससोबत विनोद खन्ना आणि फिरोज खान". रितेशच्या अभिनय प्रवासात राजकुमार यांनी त्याची खूप मदत केली होती. प्रत्येक पावलावर त्यांनी रितेशचं मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे राजकुमार तिवारी यांच्या निधनाची बातमी रितेशसाठी अत्यंत दुःखद ठरली आहे.