Join us

"मित्रा, आत्ता तर आपण शूटिंग केलं...", वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर रितेशती भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:25 IST

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे हे रितेश देशमुखचे शाळेपासूनचे मित्र. रितेशच्या 'राजा शिवाजी' सिनेमात त्यांनी भूमिकाही साकारली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांचं १५ सप्टेंबर रोजी निधन झालं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ शिंदे यांची घट्ट मैत्री होती. मित्राच्या निधनानंतर रितेश भावुक झाला आहे. त्याने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमात सिद्धार्थ यांनी छोटी भूमिकाही साकारली आहे. त्याविषयीही त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.

रितेश देशमुखने ट्वीट करत सिद्धार्थ शिंदे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरचे हे फोटो आहेत. त्याने लिहिले,"आज हे लिहिताना मला खूप दु:ख होत आहे. सिद्धार्थ शिंदे शाळेतला माझा जीवलग मित्र होता. तो सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होता. खूप प्रेमळ, नम्र, चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारा आणि अतूट पाठिंबा देणारा माझा मित्र. सहा वर्षांपूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांवर मी सिनेमा बनवत आहे हे त्याला कळलं तेव्हा त्याने मला उत्साहाने फोन केला आणि म्हणाला, 'रितेश, प्लीज मलाही राजा शिवाजी सिनेमाचा छोटा भाग व्हायची इच्छा आहे. अगदी काही सेकंदांसाठी का होईना मला स्क्रीनवर यायचं आहे. इतकं त्याचं शिवरायांवर प्रेम होतं."

तो पुढे लिहितो, "काही महिन्यांपूर्वीच संजय दत्त, मी आणि सिद्धार्थ आम्ही एकत्र शूट केलं. सिद्धार्थच्या असण्याने सेट उजळून निघाला होता. आज जेव्हा मी त्याचा सीन एडिट केला होतो तेव्हा त्याला पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं इतकं सुंदर काम त्याने केलं आहे. क्षणात वाटलं की त्याला फोन करुन हे सांगावं. मग मन हेलावणारी बातमी आली की सिद्धार्थ आता आपल्यात नाही. सिनेमात आम्ही एकत्र काम केलं, हसलो, आठवणी बनवल्या पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. सिद्धार्थ माझा भाऊ, तू खरोखर दुर्मिळ रत्न होतास. सिद्धार्थच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. मित्रा तुझ्या आत्म्याला शांती मिळो. तू आमच्या मनात कायम राहशील."

टॅग्स :रितेश देशमुखमराठी अभिनेतासर्वोच्च न्यायालय