Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिमी सेनच्या लक्झरीयस कारमध्ये सतत बिघाड, कंपनीविरोधात दाखल केला ५० कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:00 IST

रिमीने तिला होत असलेल्या मानसिक त्रासामुळे कायदेशीररित्या कंपनीकडे ५० कोटी मागितले आहेत.

'धूम', 'क्योंकी', 'गोलमाल' या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री रिमी सेन (Rimi Sen) एकाएकी सिनेसृष्टीतून गायब झाली. प्लास्टिक सर्जरीमुळे अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलून गेल्याने ती काही दिवसांपासून चर्चेत आहे. बोटॉक्स, फिलर्सचा वापर केल्याचं तिने मान्यही केलं. मात्र प्लास्टिक सर्जरी केली नसल्याचं ती म्हणाली. आता अभिनेत्री तिच्या आलिशान कारमुळे चिंतेत आहे. ज्या ठिकाणाहून कार खरेदी केली त्या शोरुमविरोधात तिने तक्रार केली आहे.

रिमी सेनने २०२० साली लैंड रोव्हर लक्झरी एसयूव्ही खरेदी केली होती. याची किंमत तब्बल ९२ लाख होती. आता कारमधील सनरुफ, साऊंड सिस्टीम, स्क्रीन आणि रियर-एंड कॅमेराच खराब झाल्याचं तिने म्हणलं आहे. सततच्या दुरुस्तीमुळे रिमी सेनने कंपनीविरोधात ५० कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. कारमधील सततच्या बिघाडामुळे मानसिक त्रासही होत असल्याचं ती म्हणाली. ही कार तिने सतीश मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड मधून घेतली होती जे जॅग्वार लैंड रोव्हरचे अधिकृत डीलर आहेत. 

रिमीने २०२० साली कोरोना लॉकडाऊन असताना कार खरेदी केली होती. लॉकडाऊन असल्याने तिला तेव्हा कारचा फारसा वापर करता आला नाही. आता जेव्हा ती कार नेते तेव्हा सतत काही ना काही बिघाड समोर येत आहे. तिने केलेल्या दाव्यात असंही म्हणलं आहे की २०२२ साली २५ ऑगस्ट रोजी रियर-एंड कॅमेरा खराब झाल्याने कार एका खांबाला आदळली होती. यानंतर तिने याची माहिती डीलरला दिली होती. यावर तिला पुरावे मागण्यात आले. यानंतर एकानंतर एक कारमध्ये बिघाड समोर येत गेला.

रिमीने तिला होत असलेल्या मानसिक त्रासामुळे कायदेशीररित्या कंपनीकडे ५० कोटी मागितले आहेत. तसंच कायदेशीर प्रक्रियेला लागणाऱ्या खर्चासाठी अतिरिक्त १० लाख रुपयांचीही मागणी केली आहे. खराब कारच्या बदल्यात तिने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंपनीकडून अद्याप यावर उत्तर आलेलं नाही.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडकार