Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोराने चाकू हल्ला केला. त्याने सैफवर चाकूने सपासप वार केले. सैफला 6 जखमा झाल्या, बराच रक्तस्त्रावही झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे. अशातच आता ज्या रिक्षातून सैफला रूग्णालयातून नेण्यात आलं होतं, त्या रिक्षाचालकाचा (Rickshaw driver Bhajan Lal) सत्कार करण्यात आला आहे.
रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा फैजान अन्सारी यांनी सत्कार केला आहे. तसेच त्यांना ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना भजनसिंग राणा म्हणाले, "मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की असे काही घडेल. मला खूप अभिमान वाटत आहे. हा सन्मान मिळाल्याने खूप आनंद होत आहे".
भजन सिंग राणांचा सत्कार करणारे सोशल मीडिया इन्फ्लूअन्सर फैजान अन्सारी यांनी ऑटो ड्रायव्हरला 'खरा हिरो' म्हटलं. ते म्हणाले, "मी म्हणेन की खरा हिरो भजन सिंग आहे. त्याने रात्री तीन वाजता अभिनेत्याला रक्ताने माखलेले पाहिले आणि रुग्णालयात नेले. जर त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तो कदाचित तिथून पळून गेला असता, पण त्याने धाडस दाखवले. आज सैफ अली खानला जे दुसरे आयुष्य मिळाले आहे. ते भजन सिंगमुळे आहे, म्हणून मी त्याला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो".
त्या रात्री काय घडलं होतं?
गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात घुसला. त्यावेळी त्याच्या घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीने चोराला पाहिले. तिने आरडाओरड सुरु केली. यावेळी बेडरुममध्ये झोपलेला सैफ जागा झाला. त्याने त्या हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सैफ आणि चोरामध्ये झटापट झाली. यात त्या चोराने सैफवर चाकूने हल्ला केला आणि तेथून पसार झाला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. पण, घरी कार तयार नव्हती, ड्रायव्हर नव्हता. म्हणून ऑटो रिक्षा बोलावली आणि त्यात टाकून सैफला रुग्णालयात नेण्यात आलं होतं.