Join us

पाकिस्तानात पाठवण्यात आला होता रवीना टंडनच्या नावाचा बॉम्ब, आता इतक्या वर्षांनी त्यावर बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:49 IST

Raveena Tondon Bomb : असं सांगितलं जातं की, कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांना चिमटा काढत होते. गंमतीत ते म्हणत होते की, आम्हाला माधुरी दीक्षित द्या, काश्मीर तुम्ही घ्या.

जसे २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट हे दिवस येतात, भारतात सोशल मीडियावर एक बॉम्बचा फोटो व्हायरल होऊ लागतो. हा काही साधासुधा बॉम्ब नाही. हा काही मनमौजी भारतीय सैनिकांच्या कारस्तानाचा नमूना आहे. कारण या बॉम्बवर अभिनेत्री रवीना टंडनचं (Raveena Tondon) नाव लिहिलं आहे.

असं सांगितलं जातं की, कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांना चिमटा काढत होते. गंमतीत ते म्हणत होते की, आम्हाला माधुरी दीक्षित द्या, काश्मीर तुम्ही घ्या. असेच एकदा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ भारतीय दौऱ्यावर आलेले असताना म्हणाले होते की, रवीना टंडन त्यांची फेवरेट अभिनेत्री आहे. जेव्हा पाकिस्तान खिल्ली उडवत होता तर भारतीय सैनिक कसे मागे राहतील. काही सैनिकांनी मिळून पाकिस्तानी पंतप्रधानांना एक बॉम्ब गिफ्ट करण्याचा प्लान केला. एका हिरव्या रंगाच्या बॉम्बवर त्यांनी From Raveena Tandon To Nawaz Sharif असं लिहून टाकलं. सोबतच त्यावर हार्टचं चित्रही काढलं.

हा बॉम्ब पाकिस्तानी पंतप्रधानांपर्यंत पोहोचला की नाही हे तर माहीत नाही. पण भारतात वर्षातून दोनदा याची चर्चा नक्की होते. महत्वाची बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतर आता रवीना टंडनने यावर भाष्य केलंय. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, 'मी तो फोटो फार उशीरा पाहिला. तरीही जगाला माझा हाच सल्ला असेल की, ज्या समस्या प्रेमाने आणि चर्चेने सोडवल्या जाऊ शकतात, त्या तशाच दूर करा. रक्ताचा रंग लाल इकडेही आणि तिकडेही आहे. जर एखाद्या आईने आपला मुलगा गमावला किंवा मुलगी गमावली तर कुणाला त्यावर गर्व असू नये. जर मला माझ्या देशाच्या सेवेसाठी तिथे उभं रहावं लागलं, तर माझ्या हाती द्या बंदूक. मी तिथे उभी राहणार'.

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर रवीनाने नुकतंच 'आरण्यक'सोबत डिजिटल डेब्यू केलं आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्याशिवाय रवीना यश आणि संजय दत्तसोबत 'केजीएफ २'मध्येही दिसणार आहे. यात संजय दत्त व्हिलनच्या भूमिकेत आहे तर रवीना पंतप्रधानाची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :रवीना टंडनसेलिब्रिटीपाकिस्तानस्फोटके