अक्षय कुमारच्या आगामी 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सिनेमात बऱ्याच कलाकारांची फौज आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारसोबत यामध्ये रवीना टंडन दिसणार आहे. ९० च्या दशकात अक्षय आणि रवीनाचं प्रेमप्रकरण होतं. मात्र नंतर त्यांचं नातं तुटलं. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांसोबत कधीच काम केलं नाही. आता कित्येक वर्षांनी ते एकाच सिनेमात दिसणार आहेत. त्यांच्यात तशीच जुनी केमिस्ट्री पाहायला मिळणार का?
अक्षय कुमार आणि रवीना टंडन २२ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. पिंकव्हिला रिपोर्टनुसार, रवीना आधीचं भांडण, राग विसरुन अक्षयसोबत पुन्हा काम करण्यासाठी तयार झाली होती. तिने सिनेमासाठी सलग १८ दिवस शूट केलं. सिनेमात रवीनाची भूमिका एकदम वेगळीच असणार आहे. अक्षय आणि रवीनाची ती जुनी केमिस्ट्री नाही तर त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. सिनेमात तिचे जास्त सीन्स हे अक्षयसोबतच आहेत. यामुळे अक्षय-रवीना ही जोडी कित्येक वर्षांनी पडद्यावर दिसणार आहे.
अक्षय कुमार आणि रवीना टंडन २००४ साली आलेल्या 'पोलिस फोर्स' सिनेमात शेवटचे दिसले होते. नंतर त्यांनी एकत्र काम केलं नाही. वैयक्तिक मतभेदांमुळेच त्यांनी एकमेकांसोबत काम करणं सोडलं अशी तेव्हा चर्चा होती. मात्र आता काळ पुढे सरकला आहे आणि त्यांच्यात कडवेपणा संपला आहे.
अक्षय आणि रवीनाने एकेकाळी 'मोहरा','खिलाडियो के खिलाडी','बारुद','कीमत' सारख्या कल्ट सिनेमांमध्ये काम केलं. आता 'वेलकम टू द जंगल'साठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. २६ जून रोजी हा मल्टीस्टारर सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये परेश रावल, सुनील शेट्टी, दिशा पाटनी, लारा दत्ता, संजय दत्त, अनिल कपूर, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिवर, श्रेयस तळपदे अशी कलाकारांची मोठी फौजच आहे.