आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'धुरंधर' (Dhurandhar) सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमात एकापेक्षा एक कलाकार आहेत. रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचा फर्स्ट लूक आला होता. सध्या सिनेमाचं शूट लडाखमध्ये सुरु आहे. दरम्यान सिनेमाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ काहीच दिवसात 'धुरंधर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
'धुरंधर'चा ट्रेलर काल २२ ऑगस्ट रोजी सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात आला. CBFC कडून ट्रेलरला U/A सर्टिफिकेट मिळालं आहे. याचाच अर्थ ट्रेलर रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीएफसी वेबसाईट अनुसार, हा ट्रेलर २ मिनिट ४२ सेकंदांचा आहे. अद्याप मेकर्सने ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच ट्रेलर प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
'धुरंधर'चा फर्स्ट लूक रणवीर सिंहच्या वाढदिवशी म्हणजेच ६ जुलै रोजी आला होता. यामध्ये सर्वांचाच डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला. सिनेमाच्या सेटवरुन तर आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रणवीर आणि संजय दत्तच्या लूकने तर खास लक्ष वेधलं आहे. तर फर्स्ट लूकमध्ये प्रत्येक कलाकाराच्या अपिअरन्सने चकित केलं आहे. सिनेमाकडून अपेक्षा चांगल्याच वाढल्या आहेत. हा एक हायऑक्टेन स्पाय थ्रिलर सिनेमा असणार आहे.
'धुरंधर' ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. रणवीर सिंहने यामध्ये सीक्रेट एजंटची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानात राहून तो दहशतवाद्यांशी दोन हात करताना दिसणार आहे.