बॉलिवूडची 'राणी' अशी ओळख असलेली अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या सुंदर आवाजामुळेच लाखो हृदयांवर राज्य करते. मात्र, याच आवाजामुळे करिअरच्या सुरुवातीला तिला एका अपमानास्पद प्रकाराला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राणी मुखर्जी 'गुलाम' चित्रपटाच्या आठवणी सांगताना भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.
राणीने सांगितले की, १९९८ मध्ये आलेल्या 'गुलाम' चित्रपटाच्या वेळी तिची खरी ओळख प्रेक्षकांसमोर येणार होती. मात्र, चित्रपटाचे निर्माते आणि खुद्द आमिर खान यांना राणीचा आवाज त्या पात्रासाठी योग्य वाटला नाही. राणी म्हणाली, "नवखी कलाकार म्हणून तुम्ही त्यावेळी जास्त बोलू शकत नाहीत. आमिर खान त्यावेळी सुपरस्टार होता, त्यामुळे त्याने जेव्हा मला सांगितले की, तुझा आवाज पात्राला साजेसा नाही, तेव्हा मी खूप दुखावले गेले होते."
आमिर म्हणाला होता की, ''श्रीदेवींच्या अनेक सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्यांचा आवाज डब करण्यात आला होता, तरीही त्या सुपरस्टार झाल्या. चित्रपट चांगला व्हावा म्हणून काही गोष्टींचा त्याग करावा लागतो'', असे सांगून राणीचा आवाज चित्रपटात न वापरता दुसऱ्या डबिंग आर्टिस्ट मोना घोष शेट्टीकडून आवाज डब करून घेण्यात आला होता. हा निर्णय निर्माते विक्रम भट, मुकेश भट आणि आमिर खान यांनी मिळून घेतला होता, असं राणीला नंतर कळालं.
राणी पुढे म्हणाली की, त्याच काळात ती 'कुछ कुछ होता है' साठी देखील काम करत होती. जेव्हा करण जोहरला 'गुलाम'मध्ये राणीचा आवाज डब होत असल्याचे समजले, तेव्हा त्याने राणीला विचारले, "तुला तुझा आवाज आवडत नाही का?"
त्यावर राणी म्हणाली की तिला तिचा आवाज आवडतो पण निर्मात्यांना तो योग्य वाटत नाही. तेव्हा करणने तिला विश्वास दिला आणि सांगितले, "मला तुझा आवाज खूप आवडतो आणि माझ्या चित्रपटात तू स्वतःच डबिंग करशील." आज राणीच्या यशात तिच्या आवाजाचा मोठा वाटा आहे, ज्यासाठी तिने करण जोहरचे आभार मानले. राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी 'मर्दानी ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Web Summary : Rani Mukerji revealed Aamir Khan initially disliked her voice in 'Ghulam,' leading to dubbing. Karan Johar supported her voice in 'Kuch Kuch Hota Hai.' Rani is now thankful.
Web Summary : रानी मुखर्जी ने खुलासा किया कि आमिर खान को शुरू में 'गुलाम' में उनकी आवाज पसंद नहीं थी, जिसके कारण डबिंग हुई। करण जौहर ने 'कुछ कुछ होता है' में उनकी आवाज का समर्थन किया। रानी अब आभारी हैं।