बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावला पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. त्याचं वजन अचानक वाढलेलं दिसत आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये तो आला असता त्याचा एकंदर लूक पाहून चाहते चकित झाले. राजकुमारला झालंय काय असा प्रश्न सर्वांना पडला. लोकांनी त्याच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. आता राजकुमारने स्वत:च याबद्दल खुलासा केला आहे.
राजकुमारने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "माझं अस्तित्व हे माझ्या कलेतूनच आहे. माझ्या आगामी #NIKAM या बायोपिकचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. या भूमिकेसाठी मला शारीरिक बदल करणं गरजेचं होतं आणि मला स्वतःमध्ये असे बदल करायला खूप आवडतं. जोपर्यंत मी माझ्या मेहनतीने एखादा 'लूक' मिळवू शकतो, तोपर्यंत माझा प्रोस्थेटिक्सवर (artificial makeup) फारसा विश्वास नाही. 'निकम'मध्ये मी तेच केलंय—मग ते वजन वाढवणं असो, वृद्ध दिसणं असो किंवा माझे केस विरळ करणं असो."
तो पुढे लिहितो, "माझ्या हेअर स्टायलिस्टचा केस विरळ करण्याला कडाडून विरोध होता. याआधीही 'BOSE' साठी अर्धे केस काढू नको किंवा वजन वाढवू नको, असं मला अनेकांनी सांगितलं होतं. 'TRAPPED' साठी जेवण सोडून इतकं वजन कमी करू नको असंही म्हटलं होतं, किंवा 'SRIKANTH' च्या वेळी कॅमेरे बंद असतानाही दृष्टिहीनासारखं वागू नको, असा सल्ला मला मिळाला होता. पण 'निकम'साठी मला ९-१० किलो वजन वाढवावं लागलं; त्यासाठी मी दिवसाला २ पिझ्झा, भरपूर मिठाई, माझे लाडके बटाटा पराठे आणि बिर्याणी खात होतो. भूमिकेला साजेसं दिसण्यासाठी मी कोणत्याही ग्लॅमरस गोष्टीचा वापर केला नाही. मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहाल, तेव्हा तुम्हाला पडद्यावर माझी ही मेहनत नक्कीच दिसेल.
आता हा संक्रमणाचा काळ आहे. आता हे वाढलेलं वजन कमी करून मला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या 'दादा'च्या म्हणजेच गांगुलींच्या भूमिकेत शिरायचं आहे. तुम्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या कामात गुंतवून ठेवण्यासाठी मी नेहमीच कठोर मेहनत करत राहीन. खूप खूप प्रेम!"
या पोस्टसोबत राजकुमारने गांगुलीवरील बायोपिकचाही खुलासा केला आहे. तसंच त्याची ही पोस्ट शेअर करत पत्नी पत्रलेखानेही त्याचं कौतुक केलं आहे. 'तुझा खूप अभिमान वाटतो. तू प्रत्येक प्रोजेक्टसाठी जीवतोड मेहनत घेतोस. एखादा कलाकार भूमिकेसाठी किती मेहनत घेतो हे जगाला कळत नाही. शेवटी येणारा निकाल कायमच सोपा वाटतो. कलाकाराच्या अवतीभोवती दिसणाऱ्या ग्लॅमरच्या मागे त्याच्या आयुष्यात घाम, रक्त, अश्रू आणि वैयक्तिक आयुष्याचं बलिदान असतं.'
Web Summary : Rajkummar Rao addressed concerns about his weight gain, explaining it was for his role in the biopic '#NIKAM'. He gained 9-10 kg by eating pizzas and biryani. He's now preparing to portray Sourav Ganguly.
Web Summary : राजकुमार राव ने अपने वज़न बढ़ने की वजह बताई, कहा कि यह बायोपिक '#NIKAM' के लिए था। उन्होंने पिज्जा और बिरयानी खाकर 9-10 किलो वज़न बढ़ाया। अब वे सौरव गांगुली का किरदार निभाने की तैयारी कर रहे हैं।