बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रजत बेदी सध्या चित्रपटांपासून दूर आहे. 'कोई मिल गया' या चित्रपटात राज सक्सेनाची भूमिका साकारल्यानंतर रजतला खूप प्रसिद्धी मिळाली होती आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्याने खुलासा केला आहे की, 'कोई मिल गया' चित्रपटात त्याचे बरेच सीन्स कापले गेले होते, ज्यामुळे तो खूप निराश झाला होता. एवढंच नाही तर त्याने बॉलिवूड इतक्या लवकर का सोडलं याचा खुलासाही केला आहे.
एका मुलाखतीत रजत बेदी याने याबाबत मोठा खुलासा केला की, कोई मिल गया हा चित्रपट हिट झाला असला तरी चित्रपटाच्या शेवटी काही सीन्स कापल्यामुळे तो निराश झाला होता. तो म्हणाला की, राकेश रोशन दिग्दर्शित चित्रपटाने त्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्याला अभिनयातून ब्रेक घेण्याची गरज असल्याची जाणीव झाली. अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, रजत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी कॅनडाला गेला.
अभिनय सोडण्यामागचे कारण सांगताना रजतने सांगितले की, प्रीती झिंटा आणि हृतिक रोशनसोबतचे अनेक सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे कळल्यावर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. जेव्हा कोई मिल गया टीम प्रमोशनसाठी गेली तेव्हा तो त्याचा भाग नव्हता, असा खुलासाही त्याने केला. रजत म्हणाला, “माझी सर्वात मोठी निराशा म्हणजे कोई मिल गया जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्यांनी मला चित्रपटाच्या प्रमोशनमधून पूर्णपणे काढून टाकले."
"मी खूप निराश झालो कारण एक अभिनेता म्हणून आमच्याही काही अपेक्षा आहेत." कोई मिल गया चित्रपटातील रजत बेदीची राज सक्सेना ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटाशिवाय रजतने इंटरनॅशनल खिलाडी (1999), द ट्रेन (2007), हेरा फेरी इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हा अभिनेता नुकताच 'गोल गप्पे'मध्ये झळकला होता. हा चित्रपट 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.