अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) सध्या तिच्या डेटिंगच्या चर्चांमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. 'मिसमॅच्ड' आणि अनन्या पांडेसोबतच्या 'ctrl' सिनेमामुळे लोकप्रिय झालेल्या विहान समतसोबत (Vihaan Samat) ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुंबईतील एका मॉलमध्ये हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता नुकतंच विहानने डेटिंगच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे.
'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत विहान समतला राधिकासोबतचा मॉलमधील तो फोटो दाखवण्यात आला. यावर त्याच्या चेहऱ्यावर फक्त हसू होतं. त्याने ना नकार दिला ना होकार दिला. रिलेशनशिपमध्ये तो कसा बॉयफ्रेंड आहे? असं विचारलं असता तो म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड असतो. मला सतत तिच्याशी संपर्कात राहायचं असतं असा मी आहे. तुम्ही जर प्रेमात आहात तर एकमेकांपासून दूर का राहायचं? पण सध्या मी सिंगल आहे. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही."
राधिका मदनविषयी तो म्हणाला, "ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत कमालीचं काम केलं आहे. मला तिचे सगळे सिनेमे आवडतात. पटाका २, अंग्रेजी मीडियम, सरफिरा, मर्द को दर्द नही होता हे तिचे चित्रपट मला आवडतात."
विहान समत सध्या 'द रॉयल्स' सीरिजमुळे चर्चेत आहे. यामध्ये इशान खट्टर, भूमी पेडणेकर, साक्षी तन्वर, झीनत अमान यांचीही भूमिका आहे. नेटफ्लिक्सवर सीरिज प्रदर्शित झाली आहे.