Raanjhanaa Re Release: २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला आणि आजही अनेकांच्या हृदयात विशेष स्थान असलेला चित्रपट 'रांझणा' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'रांझणा' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, यावेळी त्याचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या साहाय्याने नवीन क्लायमॅक्स 'रांझणा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या बदलामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय संतप्त झाले असून त्यांनी यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. "कुंदनचा शेवट म्हणजे चित्रपटाचा आत्मा" असल्याचं त्यांनी म्हटलंय.
चित्रपटातील प्रमुख पात्र कुंदनच्या बलिदानाने संपणारा मूळ शेवट, हा या चित्रपटाचा गाभा मानला जातो. आनंद एल राय यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, "कुंदनच्या मृत्यूनेच या प्रेमकथेचं मर्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. जर हा शेवट बदलला, तर संपूर्ण चित्रपटाची भावना आणि गाभाच उडून जातो"
आनंद एल राय यांनी AI आधारित नवीन क्लायमॅक्सविषयी सोशल मीडियावरून माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामध्ये त्यांचा काहीही सहभाग नव्हता, हेही स्पष्ट केलं. या क्लायमॅक्सचा तीव्र निषेध करत आनंद एल राय यांनी 'रांझणा'च्या AI आवृत्तीतून स्वतःचं नाव हटवण्याची विनंती केली आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणतात, "ही एआय-सुधारित आवृत्ती माझ्या मूळ कल्पनांविरुद्ध आहे. त्यामुळे मी यापासून स्वतःला वेगळं करतो". सध्या चित्रपटाचे हक्क तमिळनाडूतील 'अपस्विंग एंटरटेनमेंट' या वितरकाकडे असून इरॉस इंटरनॅशनलने हा निर्णय पूर्णतः व्यावसायिक फायद्यासाठी घेतल्याचा आरोप आनंद एल राय यांनी केला आहे. ते म्हणाले, "भावनांना पूर्णतः दुर्लक्षित करत हा निर्णय घेतला गेला आहे".
१ ऑगस्ट रोजी नव्याने प्रदर्शित होणार 'रांझणा'नव्या AI क्लायमॅक्ससह 'रांझणा' १ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मूळ चित्रपटाने देशभरात सुमारे ८१.३० कोटींची कमाई केली होती. आता मात्र नव्या क्लायमॅक्सला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.