हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा २ च्या प्रीमियर शोपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत एक मुलगाही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल मुलाची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. हैदराबादच्या किम्स कडल्स हॉस्पिटलने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आठ वर्षांचा तेज आयसीयूमध्ये आहे. मुलाच्या न्यूरोलॉजिकल प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मुलाला व्हेंटिलेटरवरून काढण्यासाठी ट्रेकियोस्टोमीचा विचार केला जात आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, मुलाचा ताप कमी होत आहे. रुग्णालयाच्या निवेदनात म्हटलं आहे की, मुलाला ४ डिसेंबर रोजी उपचारासाठी आणलं होतं. याच दरम्यान, हैदराबाद शहराचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनाी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर यांनी सांगितलं की, चेंगराचेंगरीच्या वेळी श्वास घेता न आल्याने तेजचं ब्रेन डेड झालं होतं आणि त्याला बरं होण्यासाठी बराच वेळ लागेल.
४ डिसेंबर रोजी, संध्या थिएटरमध्ये पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये पुष्पा २ चा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन देखील उपस्थित होता. या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटरजवळ मोठी गर्दी झाली होती. चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय रेवती आणि मुलगा तेज हे गुदमरले. पोलिसांनी सीपीआर केला आणि रुग्णालयात नेलं, जिथे रेवतीला मृत घोषित करण्यात आलं.
अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरी प्रकरणात अटक करण्यात आली होती, परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने मीडियाशी संवाद साधला. "काळजी करण्यासारखं काही नाही. मी ठीक आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यामुळे मी यादरम्यान काहीच भाष्य करणार नाही. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. पोलिसांना सहकार्य करेन" असं म्हटलं आहे.