Priyanka Chopra: हिंदी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक सौंदयवती ने आपल्या सौंदर्याचे मोहिनी घातली. मात्र, आपला फॅशन सेन्स आणि पडद्यावरील दमदार भूमिकांमुळे सिनेरसिकांच्या मनात हक्काची जागा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर तिने हॉलिवूडमध्येही स्वत ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच देसी गर्ल लवकरच एस.एस.राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करते आहे. प्रियंकाचा इंडस्ट्रीतील हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी अभिनेत्रीने प्रचंड संघर्ष केला.
अलिकडेच प्रियंका चोप्राने तिच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं. प्रियंकाने २० वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली होती. इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे आपल्याला कोणी मार्गदर्शन करणारं नव्हतं, त्यामुळे जे काम हाती येईल ते मी केलं असं तिने म्हटलं. त्याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा मिळेल ते काम केलं. मी असं करायचे कारण, मला वाटायचं निदान आपल्याला काम तरी मिळतंय हेच खूप आहे. २० व्या वर्षी मी कामाच्या बाबतीत खूप स्वार्थी होते. मला फक्त कामाची भूक होती."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "या सगळ्यात मी बऱ्याच गोष्टीचा त्याग केला. मी खूप मेहनत केली आहे. अनेक वाढदिवस चुकवले आहेत. माझे वडील रुग्णालयात असताना मी त्यांच्यासोबतही राहू शकले नाही. बऱ्याचदा दिवाळी सुद्धा साजरी केली नाही. माझं एक कुटंब आहे हे मी विसरले होते, त्यांच्यासोबत मला वेळ घालवता आला नाही. त्यावेळी खूप कष्ट, मेहनत केली. " असा खुलासा अभिनेत्रीने केला.