Join us

"आपल्या घरातील मुली...";'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रियंकाचे वडील अन् काकांनी दिला होता नकार, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:14 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने स्वत: चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडसह (Bollywood) हॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने स्वत: चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  'मिस इंडिया'चा किताब पटकावून २००० साली 'मिस वर्ल्ड'च्या मुकुटावर तिने आपलं नाव कोरलं. जगभरात तिने देशाची मान उंचावली. वयाच्या १८ व्या वर्षी प्रियंकाने हे यश मिळवलं. त्यानंतर प्रियंकाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंका चोप्राची आई मधु यांनी तिच्या प्रवासावर भाष्य केलं आहे. 

अलिकडेच मधु चोप्रा यांनी 'समथिंग बिअर टॉक' या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यादरम्यान मधु चोप्रा यांनी प्रियंकाचा 'मिस इंडिया' ते 'मिस वर्ल्ड' बनण्याच्या प्रवासावर भाष्य केलं. त्यावेळी मधु चोप्रा म्हणाल्या, "प्रियंका 'मिस इंडिया'च्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिचे वडील अशोक चोप्रा यांची परवानगी मिळणं फारच कठीण होतं. कारण त्यावेळी प्रियंकाचं बारावीच वर्ष चालू होतं. परंतु त्याहीपेक्षा प्रियंकाच्या मोठ्या काकांची म्हणजे माझ्या मिस्टरांचे भाऊ होते, त्यांची परवानगी मिळणं हे एक आव्हान आमच्यासमोर होतं. कारण ते आमच्या घरचे प्रमुख होते. जसं प्रियंकाचं या स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं  त्यानंतर मग आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना सगळं काही सांगितलं. परंतु त्यांनी हे काही मान्य नव्हतं."

पुढे मधु चोप्रा म्हणाल्या, "त्यावेळी प्रियंकाच्या काकांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की आपल्या घरातील मुली अशा गोष्टी करत नाहीत. त्यांचं ते बोलणं ऐकून प्रियंका ढसाढसा रडू लागली. तिला तेव्हा असं वाटत होतं की तिचे मोठे काका या गोष्टीला सपोर्ट करतील. पण, प्रत्यक्षात तसं घडलं नाही. त्यानंतर मी त्यांच्या पत्नीला सर्व काही समजावून सांगितलं. या सगळ्या घटना घडल्यानंतर मग पुढे प्रियांकाच्या काकांनीसुद्धा परवानगी दिली." असा खुलासा मधु चोप्रा यांनी केला. 

२००० साली प्रियंकाने 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यानंतर अभिनेत्रीने अभिनयात आपलं नशीब अजमावलं. शिवाय एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका बनली. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडसेलिब्रिटी