गुढीपाडव्यासह देशात विविध ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या सणांच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रसिद्ध रॅपर हनुमानकाइंड (सूरज चेरुकट) याचे कौतुक केले. हनुमानकाइंड हा त्याच्या 'रन इट अप' या नवीन गाण्याद्वारे भारताची पारंपारिक संस्कृती जगासमोर सादर करत असल्याचं मोदींनी सांगितलं.
'मन की बात'च्या १२० व्या भागात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "'रन इट अप' ( Run It Up) हे गाणे खूप प्रसिद्ध झालं आहे. या गाण्यात कलारीपयट्टू, गटका आणि थांग-ता यासारख्या भारतातील पारंपारिक मार्शल आर्ट्सचा समावेश आहे. या गाण्याच्या माध्यमातून जगभरातील लोकांना भारतातील या प्राचीन कलांबद्दल माहिती मिळतेय. रॅपर हनुमानकाइंडसारखे कलाकार हे भारताच्या संस्कृतीला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत".
हनुमानकाइंडचं नवीन गाणं 'रन इट अप' सलग तीन आठवड्यांपासून अधिकृत आशियाई संगीत चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. याआधी त्याचं 'बिग डॉग्स' हे गाणेही खूप प्रसिद्ध झालं होतं. 'रन इट अप' चा म्युझिक व्हिडीओमध्ये भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचे सुंदरपणे प्रदर्शन करण्यात आलंय. हे गाणे केवळ संगीत रचनाच नाही तर भारतीय संस्कृतीला चालना देण्याचे एक साधन देखील बनलं आहे.
हनुमानकाइंडचं खरं नाव सूरज चेरुकट असं आहे. १७ ऑक्टोबर १९९२ रोजी केरळमधील मलप्पुरममध्ये जन्मलेल्या सूरजचे वडील हे तेल उद्योगात काम करायचे. त्यामुळे त्याचे कुटुंब वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असे. सूरजने नायजेरिया, सौदी अरेबिया, दुबई, इटली अशा अनेक देशांमध्ये वेळ घालवला, परंतु बहुतेक वेळ तो टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये राहिला. त्याने वयाच्या १५ व्या वर्षी मित्रांसोबत रॅप करायला सुरुवात केली होती. २०१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यानं तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून व्यवसाय प्रशासनात पदवी घेतली. २०१९ मध्ये त्याटा 'डेली डोस' अल्बम प्रदर्शित झाला. यानंतर २०२४ मध्ये 'बिग डॉग्स' या गाण्याने ते जगभरात प्रसिद्ध झाला होता.