मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्लीत प्रसिद्ध असलेल्या लव-कुश रामलीला या नाटकात तिने एन्ट्री घेतली आहे. या नाटकात पूनम पांडे रावणाची पत्नी मंडोदरीची भूमिका साकारणार असल्याने वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पूनमच्या रामायणातील एन्ट्रीवरुन महाभारत होत आहे. तर साधू-संत आणि विश्व हिंदू परिषदेने याला तीव्र विरोध दर्शवला आहे.
नवरात्रीत दिल्लीमध्ये रामलीला सादर केली जाते. या रामलीलामध्ये पूनम पांडे मंडोदरीची भूमिका साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पूनमने स्वत: तिच्या सोशल मीडियावरुन याबाबत पोस्ट शेअर केली होती. रामलीलामध्ये मंडोदरीची भूमिका ऑफर झाल्याने आनंदी असल्याचं तिने म्हटलं होतं. "रामलीला हे आपली परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते की मला यात काम करण्याची संधी मिळत आहे. रामलीलासाठी माझा विचार केल्याबद्दल रामलीला कमिटीचे आभार मानते", असं पूनमने म्हटलं होतं. रामलीलामध्ये पूनम मंडोदरी तर अभिनेता आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारणार आहे.
बोल्ड कंटेटसाठी प्रसिद्ध असलेली पूनम रामलीलामध्ये दिसणार असल्याने संताप व्यक्त केला जात असून तिला ट्रोलही केलं जात आहे. विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेच्या रामलीला एन्ट्रीमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं म्हटलं आहे. तर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद यांनी "कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी रामलीला कमिटीकडून घेतली गेली पाहिजे", अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रामलीला कमिटीने काय म्हटलं?
रामलीला कमिटीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी या वादावर मौन सोडलं आहे. "पूनम पांडेने रामलीलामध्ये मंडोदरीची भूमिका साकारली तर तिच्या जीवनात बदल घडेल. तिच्यात अध्यात्मिक बदल दिसतील. ज्यामुळे तिने भूतकाळात केलेल्या चुकीच्या कामांबाबत प्रायश्चित करण्याची आणि सुधारण्याची संधी तिला मिळेल. कलाकारांकडे कलाकार म्हणून पाहिलं पाहिजे. पूनम ही भूमिका साकारण्यासाठी तयार आहेत आणि स्वत:मध्ये बदल घडवायचा आहे", असं अर्जुन कुमार यांनी म्हटलं आहे.