'फुले' हा सिनेमा (phule movie) ११ एप्रिलला रिलीज होणार होता. परंतु सिनेमावर सातत्याने होणारे वाद आणि सेन्सॉरने सुचवलेले बदल यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली. 'फुले' सिनेमाविषयी सेन्सॉरने अनेक बदल सुचवले. याशिवाय सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन (anant mahadevan) यांनी सिनेमाचा ट्रेलर बघून मतं ठरवू नये, ठरलेल्या दिवशीच सिनेमा रिलीज होईल, अशी ठाम भूमिका घेतली. अशातच या सर्व प्रकरणावर सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यपने (anurag kashyap) त्याचं मत व्यक्त केलंय.
'फुले' सिनेमाविषयी अनुराग काय म्हणाला
अनुराग कश्यपने 'फुले' सिनेमासंबंधी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सेन्सॉरने 'फुले' सिनेमावर जी कात्री लावली त्यावर आगपाखड करुन उपहासात्मक पोस्ट लिहिली आहे. अनुराग लिहितो की, "अरे भाऊ, भारतात जातीव्यवस्था अस्तित्वात नाही. धडक २ च्या वेळीही मी हेच बोललो होतो. आपल्या राजकारण्यांनी भारतातील जातीव्यवस्था संपवली आहे. बाकी ज्यांना हे काही दिसत नाही ते *** आहेत." अशाप्रकारे अनुरागने पोस्ट लिहिली आहे.
'फुले' सिनेमाचे दिग्दर्शक काय म्हणाले
'फुले' सिनेमाबद्दल जो वाद निर्माण झाला त्याविषयी अनंत महादेवन म्हणाले की, "जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे कोणत्याही गोष्टीला घाबरले नाही. त्यामुळे अशा निडर लोकांवर चित्रपट तयार केला आहे. अशा विरोधाला घाबरल्यास त्यांच्यासोबत विश्वासघात केल्यासारखे होईल. आम्ही त्याचा विचार करत नाही. आम्ही प्रामाणिकपणे चित्रपट तयार केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये. चित्रपट ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल"
“सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले बदल आम्ही केले आहेत. कोणतेही दृश्य वगळण्याचे त्यांनी सांगितलेले नव्हते. बोर्डाने चित्रपटाला यु प्रमाणपत्र दिले आहे. लोकांनी विरोध करण्याऐवजी चित्रपट पाहावा. केवळ ट्रेलर पाहून मतप्रदर्शन करू नये. चित्रपट पाहिल्यानंतर जोतिबा फुले आणि ब्राह्मण यांच्यातील संतुलित संबंध स्पष्ट होतील.” अशाप्रकारे अनंत महादेवन यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना संवाद साधला.