बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत हिची टिवटिव सारखी सुरु असते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार आणि बोलणार. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडवर निशाणा साधणारी कंगना सध्या शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आहेत. शेतकरी आंदोलनाविरोधी भूमिका घेत, कंगनाने कधी शेतक-यांना ‘दहशतवादी’ ठरवले. यानंतर नथुराम गोडसे याचा फोटो ट्विट करत वाद निर्माण केला. कंगनाची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. पण आता अनेक लोक कंगनाच्या या ऊठसूट टिवटिवामुळे कंटाळले, वैतागले असल्याचे दिसतेय. आता तर कोरोनाप्रमाणेच कंगनापासून पिच्छा सोडवण्यासाठी एखादी लस शोधावी, असे लोकांना वाटतेय.
एका युजरने अशा आशयाचे ट्विट केल्यानंतर कंगनापासून लोक वैतागल्याचे स्पष्ट झाले. होय, ‘आम्हाला कंगनापासून वाचवण्यासाठी कोणी लस बनवतेय का?’ असे ट्विट या युजरने केले. सिंगर सोना मोहपात्राने हे ट्विट रिट्विट केल्यानंतर या ट्विटने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.