Join us

अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:46 IST

परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर अक्षय कुमारने त्यांच्याकडून थेट २५ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली.

परेश रावल (Paresh Rawal) यांनी 'हेरा फेरी ३' सिनेमा मध्येच सोडल्याचीच सगळीकडे चर्चा आहे. त्यांच्या या निर्णयानंतर अक्षय कुमारनेपरेश रावल यांच्यावर २५ कोटींचा नुकसानभरपाईचा दावा केला. त्यामुळे हे प्रकरण आता वेगळं वळण घेताना दिसत आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीही परेश रावल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता नुकतंच परेश रावल यांनी या प्रकरणावर थेट उत्तर दिलं आहे. 

का सोडला हेरा फेरी ३?

'मिड डे'ला प्रतिक्रिया देत परेश रावल म्हणाले, "मला माहितीये की सर्वांना माझ्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली मी अक्षय आणि सुनीलने एकत्र काम करणं हे नेहमीच उत्साहपूर्ण असतं. पण आता मला या सिनेमाचा भाग व्हायची इच्छा नाही म्हणून मी सिनेमा सोडला आहे. मी सध्या हा निर्णय घेतला आहे. पण मी नेहमी म्हणतो भविष्यात कधी काय होईल सांगता येत नाही."

मानधनाच्या कारणामुळे सिनेमा सोडला का? यावर परेश रावल म्हणाले, "प्रेक्षकांच्या प्रेमाची तुलना पैशांसोबत होऊच शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही इतकंच यामागचं कारण आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मला खरोखरंच या घडीला ही भूमिका साकारायची इच्छा नाही असंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सोबत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि यापुढेही करु. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत."

दरम्यान, परेश रावल यांनी अक्षय कुमारने केलेल्या २५ कोटींच्या नुकसानभरपाईच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परेश रावल आगामी 'भूत बंगला' सिनेमात दिसणार आहे. यामध्येही अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे आणि प्रियदर्शन यांनीच सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल?

काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांनी त्यांच्या गाजलेल्या बाबूरावच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती. या भूमिकेचा आता त्यांना कंटाळा आल्याचं ते म्हणाले होते. हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास असंही ते मुलाखतीत म्हणाले होते.

टॅग्स :परेश रावलअक्षय कुमारबॉलिवूड