Paresh Rawal: बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेते म्हणजे परेश रावल. त्यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. कधी खलनायक, तर कधी विनोदी रुपात ते दिसले. परेश रावल सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळं चर्चेत आलेत. या मुलाखतीत त्यांनी राठी सिनेसृष्टी रंगभूमीचं भरभरून कौतुक केलं आहे. यासोबतच त्यांनी एक लोकप्रिय मराठी नाटक प्रेक्षकांना आवर्जून पाहण्याचा सल्ला दिलाय. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
परेश रावल यांनी नुकतंच द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मराठी नाटक ' संगीत देवबाभळी'चं भरभरून कौतुक केले आहे. परेश रावल म्हणाले, "मराठी नाटकं मी खूप पाहायचो. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, श्रीराम लागू...यांची नाटकं पाहायचो. मराठीत जी नवीन नाटकं यायची ती आम्ही पाहायचोच. आपण नशिबवान होतो की, मराठीत इतकी चांगली नाटकं होतात. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी दोन पावलं पुढं आहे, कारण त्यांच्याकडे सशक्त, खूप उत्कृष्ट, पुढारलेले लेखकलेखक आहेत. जर कधी संधी मिळाली तर लेखक प्राजक्त देशमुखचं संगीत नाटक आहे देवबाभळी, ते नक्की बघा", असा सल्ला त्यांनी नाटकप्रेमींना दिलाय.
पुढे ते म्हणाले, "नाटकाची गोष्ट काय आहे तर एक संत तुकारामांची पत्नी आहे आणि एक विठ्ठलाची पत्नी आहे. तुकोबांची पत्नी गर्भवती आहे आणि तुकोबा विठ्ठलाच्या शोधात भटकत आहेत. तर विठ्ठल हे तुकोबांच्या गर्भवती पत्नीची काळजी घेण्यासाठी आपली पत्नी रखुमाईला पाठवतात. जेव्हा या दोन बायका एकत्र आल्या की, काय घडतं? हे या नाटकात आहे. संगीत आहे, गाणी आहेत. त्यांना प्रेक्षकांना डेमो द्यावा लागतो की हे रेकॉर्ड केलेलं नाहीये".