'हेरा फेरी ३' सिनेमा सीक्वलमुळे नाही तर परेश रावल यांच्या एक्झिटमुळेच जास्त चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा होताच बाबूभैय्याची भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतली होती. त्यानंतर अनेकांनी समजूत घातल्यानंतर परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सिनेमा करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता अभिनेता अक्षय कुमारने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "नाही, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. गोष्टी कायद्यापर्यंत पोहोचल्या होत्या. जेव्हा कायदेशीर बाबीही समोर येतात तेव्हा तो पब्लिसिटी स्टंट आहे असं आपण म्हणू शकत नाही. हे खरंच घडलं होतं. पण, आता सगळं काही ठीक झालं आहे. लवकरच घोषणादेखील होईल. नक्कीच काही गोष्टी बिघडल्या होत्या. पण, आता सर्व काही ठीक झालं आहे. आता आम्ही एकत्र आहोत आणि कायमच राहू".
दरम्यान, 'हेरा फेरी ३' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून परेश रावल यांनी एक्झिट घेतल्याने चाहते नाराज होते. मात्र, आता पुन्हा परेश रावल बाबूभैय्या हे पात्र साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे 'हेरा फेरी ३'मध्ये चाहत्यांना अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे त्रिकुट पाहायला मिळणार आहे.