Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी पक्की मराठी, मग..." पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:54 IST

मराठी जेवणाबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पल्लवी जोशींकडून पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण!

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी "मराठी जेवण म्हणजे गरिबांचं जेवण" असं विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर यावर बरीच टीका झाली. या वादावर विवेक अग्निहोत्री यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले होते. आता त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. "तो एक नवरा-बायकोमधील एक साधा, विनोदी संवाद होता" असं म्हणतं त्यांनी नवऱ्याची पाठराखण केली.

सिद्धार्थ कन्ननय याला दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी जोशी यांनी या वादावर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "खरं तर, ते विवेक बोललाच नव्हता, ती टिप्पणी मीच केली होती.  काय आहे ना काही लोकांकडे खूप वेळ असतो. त्यांना एखाद्या लहानशा किंवा सामान्य गोष्टीमध्येही विनाकारण दोष काढण्याची हौस असते. तो नवरा-बायकोमधील एक गमतीशीर छोटासा संवाद होता. पण, लोकांना ती गोष्ट फारच गंभीर वाटली"

पुढे ती म्हणाली, "मला नेहमीच हलकं आणि पौष्टिक खाणं आवडतं. मी फूडी नाहीये. जेवणाची वेळ झाली की जेवण करुन घेते. मी साधं डाळ-भात किंवा डाळ-भाकरी खाते. त्यामुळे माझे मित्र मला म्हणतात की तु काय असं बॅट-बॉल सारखं करतेस. जरा लोणचं, चटणी असं काही खात जा. पण, मी ते खात नाही. कारण एकतर ते आरोग्यदायी नाहीत आणि दुसरं म्हणजे मला इतका वेळच नसतो. मी असं जेवण जेव्हा विवेकसाठी बनवायचे. तेव्हा तो म्हणायचा हे तुमचं गरीबांचं जेवण मला नकोय. कारण त्याला पोळी, चटणी, लोणचं, पापड असं सगळं भरलेलं ताट हवं असतं. तर तेव्हा तो फक्त नवरा-बायकोमध्ये झालेला मजेशीर संवाद होता". 

पल्लवी जोशी म्हणाल्या, "त्यानंतर लोकांनी अर्थाचा अनर्थ  काढला. काही लोकांनी तर नोटीसही पाठवली, की तुम्ही मराठी संस्कृतीचा अपमान केला आहे. अरे, त्याची बायकोच पक्की मराठी आहे ना? जर खरंच मराठीचा अपमान झाला असता किंवा काही अपमानास्पद वाटलं असतं, तर मीच आधी रागावले असते आणि त्याला शांत केलं असतं. मग तो असा अपमान कसा करेल?" असे सांगत पल्लवी जोशी यांनी या वादावर पूर्णविराम दिला आहे.

पल्लवी जोशी यांनी सोशल मीडियाच्या नकारात्मक बाजूवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, "पूर्वी लोक बागेत किंवा चहाच्या टपरीवर गॉसिप करायचे, आता तेच सोशल मीडियावर होतंय. लोक एकाच गोष्टीवरून इतरांबद्दल आपलं मत बनवतात. सोशल मीडियाचा माणसा-माणसांमधील नात्यांवर वाईट परिणाम होत आहे", असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :पल्लवी जोशीविवेक रंजन अग्निहोत्रीमराठी