Join us
Daily Top 2Weekly Top 5

करण जोहरचा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत! १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवताच झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:11 IST

निर्माता करण जोहरच्या चित्रपटाने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे.

Homebound In Oscar 2026: निर्माता करण जोहरच्या 'होमबाउंड'ने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. 'होमबाउंड' हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये निवडला गेला आहे. ही आनंदाची बातमी समजताच करण जोहर भावूक झाला. नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात विशाल जेठवा, ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भुमिका आहे. 

'होमबाउंड' या चित्रपटाची सुरुवातच धडाक्यात झाली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले तेव्हा प्रेक्षकांनी तब्बल ९ मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवून चित्रपटाचे कौतुक केले होते. आता या चित्रपटाची ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठीच्या प्रार्थमिक फेरीत जगभरातील उत्कृष्ट ८६ प्रवेशिकांमधून एकूण १५ चित्रपटांची निवड झाली. त्यात 'होमबाउंड'चा समावेश आहे.

करण जोहरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "'होमबाउंड'च्या या प्रवासाबद्दल मला किती अभिमान, आनंद वाटतोय, हे शब्दांत मांडणं कठीण आहे. हा इतका अभिमानास्पद आणि महत्त्वाचा चित्रपट आमच्या फिल्मोग्राफीचा भाग असणं हे खरोखर सौभाग्याचं आहे. आमचं स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी नीरज घायवान तुझे मनापासून आभार. कान्सपासून थेट ऑस्कर शॉर्टलिस्टपर्यंतचा हा प्रवास अत्यंत भावनिक आणि भारावून टाकणारा ठरला आहे. या चित्रपटाच्या टीममधील प्रत्येकाला मनापासून प्रेम आणि शुभेच्छा!", असं त्यानं म्हटलं. तसेच धर्मा प्रॉडक्शनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलं, "होमबाउंडला ९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जगभरातून आम्हाला मिळालेल्या या प्रेमाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत".

कधी होणार अंतिम घोषणा?ऑस्कर २०२६ साठीची ही केवळ शॉर्टलिस्ट आहे. पुढील नामांकनाच्या फेरीत,  २२ जानेवारी २०२६ मध्ये या १५ चित्रपटांमधून ५ चित्रपटांची निवड केली जाईल. मुख्य ऑस्कर सोहळा १५ मार्च २०२६ रोजी पार पडणार असून, कॉमेडियन कॉनन ओ'ब्रायन या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. जर तुम्ही हा बहुचर्चित चित्रपट अद्याप पाहिला नसेल, तर तो सध्या नेटफ्लिक्स  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Johar's 'Homebound' shortlisted for Oscars, director gets emotional.

Web Summary : Karan Johar's 'Homebound' made it to the Oscars' shortlist. Directed by Neeraj Ghaywan, starring Janhvi Kapoor, Ishaan Khattar and Vishal Jethwa, the film's journey from Cannes to the Oscars shortlist has been emotional. The final announcement will be on January 22, 2026.
टॅग्स :ऑस्करकरण जोहर