सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या 'सैयारा' सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मोहन सुरीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत असलेला 'सैयारा' बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये सिनेमाला हाऊसफूलचे बोर्ड लागले आहेत. तरुण-तरुणी 'सैयारा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'सैयारा'च्या स्क्रिनिंगदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या सिनेमाची तरुणाईमध्ये तर क्रेझ आहेच. पण, आता वयोवृद्ध लोकही सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात असल्याचं दिसत आहे. चक्क एक आजोबा 'सैयारा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले होते. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी मग्न होऊन आजोबा सिनेमा बघत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'सैयारा' सिनेमा १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २१ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर सिनेमाच्या कमाईत वाढच होत आहे. अवघ्या ४ दिवसांतच सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला. आत्तापर्यंत सिनेमाने १४० कोटींची कमाई केली आहे.