अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा देवगण ही चांगलीच चर्चेत आहे. निसा आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही? असा सर्वांच्या मनातला प्रश्न होता. याविषयी निसाची आई अर्थात अभिनेत्री काजोलने स्पष्ट मत व्यक्त केलंय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत निसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही, असं काजोल म्हणाली. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
निसाचा बॉलिवूडमधून दूर राहण्याचा निर्णय
अजय देवगण आणि काजोलची मुलगी म्हणून निसा देवगण नेहमीच चर्चेत असते. इतर स्टार किड्सप्रमाणे ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण अभिनयात करिअर करण्याऐवजी तिने या क्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. काजोलने एका मुलाखतीत सांगितले की, “माझी मुलगी २२ वर्षांची आहे आणि तिने अभिनयाच्या क्षेत्रात न येण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे विचार आता खूप स्पष्ट आहेत.” त्यामुळे अजय- काजोलची पुढची पिढी अभिनय क्षेत्रात येणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.
निसा देवगणने बॉलिवूडमध्ये न येण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामागे अनेक कारणं असू शकतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, स्टार किड्सना सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ‘नेपोटिझम किड’ म्हणून ट्रोल केले जाते. सार्वजनिक आयुष्यात त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी टीका सहन करावी लागते. काजोलने स्वतः अनेकदा सांगितले आहे की, फिल्म इंडस्ट्रीचा भाग असण्याचे फायदे असले तरी, प्रसिद्धीसोबत येणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो.
काजोलने म्हटले आहे की, “माझ्या मुलीला हा सर्व त्रास नको आहे. त्यामुळे, निसाने अभिनयापेक्षा इतर क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले आहे. हा निर्णय तिच्यासाठी योग्य आहे, कारण तिला शांत आणि खाजगी आयुष्य जगता येईल.'' यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला असला, तरी निसाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला जात आहे.