परेश रावल (paresh rawal) हे अनेकदा बिनधास्त, बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ऑनस्क्रीन भूमिकांमधून लोकांना खळखळून हसवणारे परेश रावल रिअल लाईफमध्ये अनेक विषयांवर त्यांचं मत व्यक्त करत असतात. गेली ३० हून अधिक वर्ष परेश रावल हे मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. परेश रावल यांनी एका मुलाखतीत त्यांचे इंडस्ट्रीतील जवळचे मित्र कोण, या प्रश्नावर तीन कलाकारांची नावं घेतली. आश्चर्य म्हणजे परेश रावल यांची ज्या कलाकारासोबत ऑनस्क्रीन जोडी जमते, त्या अक्षय कुमारचं (akshay kumar) नाव त्यांनी घेतलं नाही. काय म्हणाले परेश रावल जाणून घ्या
परेश रावल यांनी घेतली या तीन कलाकारांची नावं
परेश रावल यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं की, अक्षय कुमारला ते खास मित्र म्हणू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर देताना परेश रावल म्हणाले की, "अक्षय कुमार माझा मित्र नाही तर सहकारी आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक नाती ही प्रोफेशनल असतात. माझे खरे मित्र हे शाळा आणि मी जेव्हा रंगभूमीवर कार्यरत होतो तेव्हा झाले आहेत. यामध्ये जॉनी लिव्हर, ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह हे माझे खास मित्र आहेत." असा खुलासा परेश रावल यांनी केला.
त्यामुळे एकूणच अक्षय कुमार मित्र नाही तर सहकारी आहे, यावर परेश रावल यांचं ठाम मत आहे. परेश रावल यांच्या मनात अक्षय कुमारविषयी नितांत आदर आहे. "तो खूप प्रामाणिक व्यक्ती असून प्रचंड मेहनती आहे", अशा शब्दात परेश रावल यांनी अक्षयचं कौतुक केलं होतं. परेश रावल यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ते अक्षय कुमारसोबत 'भूत बंगला' आणि 'हेरा फेरी ३' या सिनेमात झळकणार आहेत.