Join us
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:56 IST

बिग बॉस फेम अभिनेत्री या सिनेमाचा भाग आहे. ही घटना घडण्याआधी सुदैवाने ती मुंबईत गेली. काय आहे हा प्रकार?

'बिग बॉस १६' फेम अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया ज्या सिनेमात काम करतेय त्या टीमसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. निम्रत तिच्या आगामी 'नेमेसिस' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भोपाळमध्ये गेली असताना तिच्या सिनेमाच्या टीमसोबत ही खळबळजनक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या क्रू मेंबर्सना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्यात आलंय. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भोपाळमध्ये सुरू असलेल्या शूटिंग दरम्यान निर्मात्यांनी हॉटेलचे बिल न भरल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने संतापून हॉटेलच्या गेटला टाळे लावले. यामुळे जवळपास ४५ ते ५० क्रू मेंबर्स हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. रिपोर्टनुार, एका हॉटेलचे १५ लाख तर दुसऱ्या हॉटेलचे ५ लाख, असे एकूण २० लाख रुपयांचे बिल भरणं बाकी असल्याने हॉटेल व्यवस्थापनाने हा प्रकार केला आहे.

काय आहे कारण?

'नेमेसिस' या चित्रपटाचे निर्माते आलोक कुमार चौबे आणि संजय गुप्ता यांच्यातील आर्थिक मतभेद हे या परिस्थितीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. एका निर्मात्याने प्रकल्प सोडल्यामुळे आर्थिक भार दुसऱ्यावर आला, ज्याचा फटका थेट कर्मचाऱ्यांना बसला आहे. अडकलेल्या क्रू मेंबर्समध्ये कॅमेरा, लाइट, मेकअप आणि आर्ट डिपार्टमेंटमधील लोकांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना वेळेवर जेवण दिले जात नसल्याचा आणि त्यांचे मानधनही थकवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत बिल भरले जात नाही, तोपर्यंत कोणालाही सामान घेऊन बाहेर पडू दिले जाणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री निमरित कौर अहलुवालिया ही या गोंधळापूर्वीच भोपाळ सोडून मुंबईला रवाना झाली आहे. मात्र, तांत्रिक टीम आणि इतर कर्मचारी अजूनही तेथे अडकले आहेत. या प्रकरणावर निर्माते आलोक कुमार चौबे यांनी सांगितले की, कोणालाही बंधक बनवलेले नाही. चित्रपट निर्मितीमध्ये अशा आर्थिक अडचणी अनेकदा येतात आणि आम्ही हे प्रकरण चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद जेवणाचा दर्जा आणि हॉटेलच्या बिलावरून झाला आहे. अद्याप कोणीही याविषयी अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. मुंबईतील टीम हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा करत असून लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या हे प्रकरण मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय बनले असून, क्रू मेंबर्सनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nimrat Kaur film crew held hostage in Bhopal over unpaid bills.

Web Summary : The crew of Nimrat Kaur's upcoming film 'Nemesis' was confined to a Bhopal hotel due to unpaid bills totaling ₹20 lakhs. Disputes between producers caused the issue, leaving crew members unpaid and without food. The actress had already left before the incident.
टॅग्स :भोपाळटेलिव्हिजनबॉलिवूडबिग बॉस १९