२०१९ साली प्रदर्शित झालेल्या उरी-द सर्जिकल स्ट्राइक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. याशिवाय देशभक्तीवर आधारीत बऱ्याच सिनेमांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. याच कारणामुळे २०२५मध्ये सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या तणावावर सिनेमा बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मात्र या परिस्थितीत या विषयावर सिनेमा बनवणाऱ्यांवर नेटकरी नाराज झाले आहेत आणि या सिनेमावरील पोस्टर समोर येताच लोकांनी निर्मात्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
एक-दोन नाही तर बरेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी ऑपरेशन सिंदूर या शीर्षकाने आपला सिनेमा रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र हे टायटल नक्की कोणाला मिळणार, हे अद्याप ठरलेलं नाही. पण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी आणि नितीन कुमार गुप्ता यांनी या विषयावर बनवत असलेल्या सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या प्रॉडक्शनची जबाबदारी निकी विकी भगनानी फिल्म्स आणि द कॉन्टेंट इंजिनिअरकडे देण्यात आली आहे.
नेटकरी भडकले
हे पोस्टर पाहून नेटकरी नाराज झाले आहेत आणि ते टीका करत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, स्वतः आपल्या देशाची थट्टा करू नका. दुसऱ्या युजरने लिहिले की, लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि संपूर्ण बॉलिवूडला प्रत्येक गोष्टीत पैसे छापण्याचे माध्यम बनवले आहे. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपले नाही आणि तुम्ही सगळे या चिंताजनक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहात. प्रार्थना करतो की तुमचे कर्म तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल. आणखी एकाने लिहिले की, युद्ध अजून बाकी आहे मित्रा. अनेकांनी निर्मात्यांना कमेंट करून चांगलेच फटकारले आहे.