बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (neena gupta). स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक निर्णय यांच्यामुळे नीना गुप्ता कायमच चर्चेत असतात. सध्या त्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांनी वयाच्या पन्नाशीमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. मात्र, त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला हे एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
अलिकडेच नीना गुप्ता यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी भाष्य केलं. नीना यांनी २००८ मध्ये दिल्लीस्थित चार्टर्ड अकाऊंट असलेल्या विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं. या लग्नाच्या वेळी नीना यांचं वय ५० होतं. या लग्नापूर्वी नीना या मसालाबाचा सिंगल पॅरेंट म्हणून सांभाळ करत होत्या.
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलत असतांना त्यांनी त्यांच्या लग्नावर भााष्य केलं. ''मला प्रेम वैगरे काही कळत नाही. मला फक्त माझ्या मुलांवर प्रेम करायचं कळतं. मी कधीच दुसऱ्या गोष्टींकडे प्रेमभावनेने कधी पाहिलं नाहीये. कदाचित मी या टॉपिकवरही एखादं पुस्तक पुढे जाऊन लिहेन'', असं नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्ता यांच्या या वक्तव्यावर, ''जर तुम्हाला प्रेम भावना कळत नाहीत तर मग लग्न करायचा निर्णय कसा काय घेतला?'', असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लग्न करण्याच्या निर्णयावर भाष्य केलं.
नीना गुप्ता यांनी वयाच्या पन्नाशीत का केलं लग्न?
''लग्न करणं ही माझी गरज होती. जर तुम्हाला समाजात रहायचं असेल तर काही नियमांचं पालन करावं लागतं. काही गोष्टी मी या माझ्या चुकांमधून शिकले. जेव्हा मी घराबाहेर पडायचे त्यावेळी लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचे. पण, लग्नानंतर त्याच लोकांच्या नजरा बदलल्या'', असं नीना गुप्ता म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, ''मला खरं तर या सगळ्या विषयावर बोलायला आवडत नाही. पण, सत्य हेच आहे की लग्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी नीट होतात.'' दरम्यान, नीना गुप्ता या कायम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. नीना गुप्ता यांना एक लेक असून १९८९ मध्ये तिचा जन्म झाला. तेव्हापासून नीना यांनी मसाबाचा सिंगल पॅरेंट म्हणून सांभाळत केला आहे. मसाबा आज बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते.