Nana Patekar on Vaishnavi Hagawane Case: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. पण, त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनाही पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणावरून पुन्हा एकदा हुंडाबळी हा विषय चर्चेत आला आहे. या प्रकरणावर ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी संताप व्यक्त केलाय.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर समाजातील हुंडाप्रथा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या नादात होणाऱ्या अतिरेकी उधळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना आपली स्पष्ट भूमिका मांडली. नाना पाटेकर म्हणाले, "दौलतजादा करणारी, तमाशाला जाणारी, व्यसनाधीन माणसं समाजाचा भाग आहेत. अशी माणसे समाजात असतात, हे वास्तव नाकारता येणार नाही. झाडावर फळे असतात आणि रोगही येतो. म्हणून मग झाडे वाढवायची नाहीत का? फळे चाखायची नाहीत का?"
लग्नसोहळे हा वैयक्तिक विषय आहे. लग्नावर अनाठायी खर्च करायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचबरोबर तो संस्काराचा भाग आहे. माझ्यापुरतं बोलायचं तर मी असा खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी देईन".
हुंडाबळीसारख्या गंभीर विषयावर भाष्य करताना नाना पाटेकर म्हणाले, "समाजात हुंडाबळी ही एक वृत्ती आहे. अशा लोकांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात विसंगती आहे. काय मूर्खपणा सुरू आहे, ही चर्चा करण्यापेक्षा मी काय करू शकतो, हा विचार आपण करावा. सिनेमा हे केवळ करमणुकीचं साधन नाही. समाजातील विसंगती आम्ही मांडतो.