Join us

एन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये ही अभिनेत्री करणार श्रीदेवीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 14:52 IST

एनटीआर आणि श्रीदेवी यांनी १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.

ठळक मुद्देसूत्रांच्या माहितीनुसार राकुल प्रीत सिंग साकारणार श्रीदेवीची भूमिकाराकुल प्रीत बायोपिकमध्ये काम करण्यास उत्सुक

तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामाराव यांच्या पत्नी बासव तारकम यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन करणार असल्याचे बोलले जात आहे. तर या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री राकुल प्रीत सिंगचा विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. एनटीआर यांचा मुलगा नंदमुरी बालाकृष्णन चित्रपटात आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.

एनटीआर आणि श्रीदेवी यांनी १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवीच्या रोलसाठी अभिनेत्री राकुल प्रीतला विचारण्यात आले आहे आणि ती या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्या हार्मोनियम शिकत असल्याचे बोलले जात आहे. ती हार्मोनियममधील बारकावे शिकत आहे. केवळ सहा दिवसात ती बेसिक हार्मोनियम शिकली. तिचे प्रशिक्षक व संगीतकार नितीन शंकर यांनी विद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रवि किशन रामाराव यांच्या जवळच्या मित्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. रवि किशनने या चित्रपटात भूमिका मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. रामाराव यांच्या मित्राची भूमिका साकारायला मिळणे ही मोठी संधी असून ही आम्हा भोजपूरींसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे रवि किशन म्हणाला. एनटीआर यांच्या बायोपिकमध्ये नंदमुरी बालाकृष्णन, विद्या बालन रवी किशन यांच्यासोबत बाहुबली फेम राणा दुग्गाबत्तीदेखील काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

टॅग्स :विद्या बालन