Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला पैसे देण्यापेक्षा साडीच्या दुकानात घेऊन चल..."; आशा भोसलेंचं शेवटचं गाणं रेकॉर्ड करणाऱ्या संगीतकाराने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:36 IST

प्रसिद्ध संगीतकाराने आशाजींसोबत केलेल्या शेवटच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगितला असून ही गाणी अजून प्रदर्शित झालेली नाहीत. आशाजींचं हे गाणं प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलं आहे.

महान गायिका आशा भोसले यांचं रविवारी, १२ एप्रिल रोजी निधन झालं. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच संगीतकार शमीर टंडन यांनी आशाजींच्या आठवणींना उजाळा देत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आशाजींसोबत केलेल्या शेवटच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगितला असून ही गाणी अजून प्रदर्शित झालेली नाहीत. आशाजींचं हे गाणं प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलं आहे.

शमीर टंडन यांनी इंस्टाग्रामवर आशाजींसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत—एक त्यांच्या घरचा आणि दुसरा स्टुडिओमधील. या फोटोंसोबत त्यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. शमीर लिहितात, "काल संपूर्ण दिवस तुमच्या घरी तुम्हाला शांत पण नेहमीप्रमाणेच हसताना पाहून मला मनापासून समाधान वाटले. 'आयर्न लेडी', तुम्ही आम्हाला अगदी तशाच सोडून गेलात, जसा तुम्ही विचार केला होता."

टंडन यांनी पुढे लिहिले, "आशा आई, तुम्ही दररोज त्याच उत्साहात गात असताना आणि दररोज आपला रियाझ पूर्ण करून आम्हाला सोडून गेलात. तुम्ही माझ्यासाठी पोहे आणि कॉफी बनवायचात. माझ्याच हातचे पोहे खा, असा आग्रह करायचात. तुम्ही पुढची रेकॉर्डिंग, पुढची मैफिल, पुढची स्टुडिओ व्हिजिट आणि भविष्यातील प्रोजेक्ट या सर्व गोष्टींच्या प्लॅनिंगच्या गप्पा मारता मारता आम्हाला सोडून गेलात."

शमीर यांनी एका खास इच्छेचा शेवटी उल्लेख करताना लिहिले, "तुम्ही मला सांगून गेलात की, आपल्या शेवटच्या गाण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही नको आहे. त्याऐवजी, तुमची इच्छा होती की मी तुम्हाला एका मोठ्या साडीच्या दुकानात घेऊन जावे आणि तुमच्यासाठी एक सुंदर साडी विकत घ्यावी. तुम्ही अगदी तशाच गेलात, जसं तुम्ही नेहमी म्हणायच्या.", अशाप्रकारे शमीर यांनी हा खास खुलासा केला. शमीर यांनी पोस्ट लिहिल्याप्रमाणे आशाताईंचं शेवटचं गाणं प्रेक्षकांना लवकरच ऐकायला मिळणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's last song: Composer reveals her unique request.

Web Summary : Composer Shameer Tandon shared memories of Asha Bhosle, revealing her last recording and a heartfelt wish for a saree instead of payment. The song, penned by Prasoon Joshi, is yet to be released.
टॅग्स :आशा भोसलेबॉलिवूडटेलिव्हिजनसंगीत