Join us

मलायका अरोराविरुद्ध कोर्टाकडून वॉरंट जारी, खटल्याचा सैफ अली खानशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:59 IST

मलायका अरोराविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, प्रकरण नेमकं काय?

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री कायदेशीर कचाट्यात अडकली आहे. मलायका अरोराचे नाव एका वर्षानुवर्षे जुन्या प्रकरणात समोर आलं आहे.  बॉलिवूडच्या 'छैय्या छैय्या' गर्लविरोधात मुंबईतील न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. हे प्रकरण बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांचे जबाब घेतले जात आहेत. अलिकडेच, मलायकाची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरानं साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. 

हे प्रकरण २२ फेब्रुवारी २०१२ रोजी (Saif Ali Khan Hotel Brawl Case 2012) घडलेलं. सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि काही मित्रांसह मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला पोहचले होते.  एनआरआय व्यावसायिक इक्बाल मीर शर्मा यांनी केलेल्या आरोपांनुसार, सैफ आणि त्याच्या गटानं हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात गोंधळ घातला होता. त्यावर आक्षेप घेतल्यावर सैफनं आपल्याला धमकावलं आणि नाकावर ठोसा मारला. ज्यामुळे नाक तुटलं. तसेच सासरे रमन पटेल यांनाही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे सैफचं म्हणणं आहे की,  इक्बाल मीर शर्मा यांनी  उपस्थित असलेल्या महिलांविरुद्ध अश्लील टिप्पणी केली होती, ज्यामुळे हाणामारी झाली.

 या प्रकरणात, सैफ आणि त्याचे दोन मित्र  शकील लद्दाख आणि बिलाल अमरोही यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ (हल्ला) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अटकेनंतर तिघांनाही जामीन मिळाला. मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाचे मुख्य न्यायदंडाधिकारी के एस झावर या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत. घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या गटात मलायका होती. न्यायालयाने तिला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितलं होतं. गेल्या १५ फेब्रुवारी रोजी तिच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. परंतु ती हजर झाली नाही. यानंतर, सोमवारी न्यायालयाने पुन्हा वॉरंट जारी केले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होईल.

टॅग्स :मलायका अरोरासैफ अली खान मुंबई